• Sat. Mar 14th, 2026
    Jalna Accident : रावसाहेब दानवेंच्या पीएच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, मंडप व्यावसायिक दुचाकीस्वाराचा जीव गेला

    भरधाव कारच्या धडकेत विरेगावमधील मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पीएची आहे. पोलिसांनी कार जप्त केली असून तपास सुरू केला आहे.

    जालन्यात भरधाव कारच्या धडकेत मंडप व्यावसायिक विलास दळवी यांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : भरधाव वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक दिल्याने मंडप व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन–जाफ्राबाद मुख्य मार्गावरील विरेगाव येथे घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

    रस्त्याच्या कडेला उभे असताना धडक

    मिळालेल्या माहितीनुसार, विरेगाव येथील रहिवासी विलास सिताराम दळवी हे मंडप व जनरेटर व्यवसायाशी संबंधित होते. नेहमीप्रमाणे ते काही कामानिमित्त जाफ्राबाद–भोकरदन मार्गावरील रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी जाफ्राबादच्या दिशेने भोकरदनकडे येत असलेल्या भरधाव कारने (क्रमांक एमएच 20 बीवाय 9908) त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दळवी गंभीर जखमी झाले.

    उपचारासाठी नेत असताना मृत्यू

    अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

    Maharashtra TimesJalna Accident : रावसाहेब दानवेंच्या पीएच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, मंडप व्यावसायिक दुचाकीस्वाराचा जीव गेला

    माजी मंत्री दानवे यांच्या पीएची कार

    दरम्यान, अपघातग्रस्त कारचा चालक हा भाजप नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे स्वीय सहाय्यक गजानन तांदूळजे यांची असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती व तपास पोलिसांकडून सुरू असून नेमका चालक कोण होता, याची खातरजमा करण्यात येत आहे.

    गावात शोककळा

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. विलास दळवी हे विरेगाव परिसरात मंडप व्यवसायामुळे परिचित होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. दळवी यांच्यावर सायंकाळी सहा वाजता विरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा