• Sun. Mar 15th, 2026
    Nanded News : अर्जित रजेच्या रकमेवरून वाद; महाविद्यालयात कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवले, एमजीएम कॉलेजमधील प्रकार

    नांदेडमधील एमजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयात खळबळ; सेवानिवृत्त कर्मचारी सुनील कुलकर्णी यांनी थकीत पैशांच्या वादातून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ८० टक्के भाजलेल्या कुलकर्णींची प्रकृती गंभीर असून प्रशासनाने आरोप फेटाळले आहेत.

    थकीत अर्जित रजेच्या पैशांवरून कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवून घेतले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड: नांदेडमधील एमजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी सुनील कुलकर्णी यांनी अर्जित रजेची रक्कम न मिळाल्याच्या कारणावरून महाविद्यालय परिसरात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ते सुमारे ८० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. कुटुंबियांनी वेतन थकल्याचा आरोप केला असताना, संबंधित रकमेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे.

    नेमकं काय घडलं?

    सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युइटीच्या रकमेच्या वादातून एका कर्मचाऱ्याने महाविद्यालयातच स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुनील कुलकर्णी असे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव असून ते सुमारे ८० टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून वेतन देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटना घडली त्या वेळी जखमी व्यक्तीची पत्नीही तिथे उपस्थित होती.

    अर्जित रजेच्या रकमेवरून वाद

    नांदेड शहरात माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचे एमजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. महाविद्यालयात सुनील कुलकर्णी हे शिपाई पदावर कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अर्जित रजेची रक्कम मिळवण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडे मागणी केली होती. पैसे न मिळाल्याने कुलकर्णी हे आपल्या पत्नीसह महाविद्यालयात पोहोचले होते.

    Maharashtra TimesJalna Accident : रावसाहेब दानवेंच्या पीएच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, मंडप व्यावसायिक दुचाकीस्वाराचा जीव गेला

    स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले

    संबंधित विभागात त्यांनी अर्जित रजेच्या रकमेबाबत विचारणा केली. त्यानंतर महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या मैदानात येऊन त्यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले आणि स्वतःला पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचाव करत आग विझवली. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अर्जित रजा व ग्रुप एलआयसीचे जवळपास २० ते २५ लाख रुपये थकल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

    Maharashtra TimesKalyan News : पती सोडून गेला… पण आई हरली नाही! हातात ऑटोची स्टेअरिंग, शेजारी 3 वर्षांची चिमुकली; मुलीच्या भविष्यासाठी संघर्ष

    प्रकरण न्यायप्रविष्ट, महाविद्यालय प्रशासनाचा दावा

    दरम्यान, या प्रकरणानंतर महाविद्यालय प्रशासनाने खुलासा केला आहे. सुनील कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना नियमानुसार सेवानिवृत्तीची रक्कम देण्यात आली असून एलआयसी आणि ग्रॅज्युइटीची रक्कमही मिळाली आहे. तसेच त्यांना पेन्शनही सुरू आहे. केवळ अर्जित रजेचा विषय प्रलंबित असून ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती एमजीएम महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष कोटगीरे यांनी दिली. कुटुंबियांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा