• Sat. Sep 21st, 2024
सेलिब्रिटी म्हणून हिणवलं, संपर्क नाही म्हणत डिवचलं, राजीनाम्यावरून ऐकवलं, दादांनी सुनावलं

मंचर (आंबेगाव) : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना पक्षात मी घेतले, उमेदवारी दिली, दिलीप वळसे पाटील आणि माझ्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं. परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात कुठेही संपर्क ठेवला नाही. अमोल कोल्हे हे कोरोना काळात राजीनामा द्यायला निघाले होते, पण त्यांना मी समजावून सांगितले. सेलिब्रेटी नेता निवडून आला पण पाहिजे असे काम केले नाही, त्यामुळे पक्षातील अनेक जण नाराज झाले, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर करताना २०१९ ला आमच्या सांगण्यावरून तुम्ही अमोल कोल्हे यांना मते दिली पण यावेळी शिरूरमधून आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले.शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. आढळरावांच्या सोबत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. यासमयी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका करताना आढळराव राष्ट्रवादी असतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत नवी समीकरणे शिरूरकरांना समजावून सांगितली.
राष्ट्रवादी होती-आहे दादांच्या मनात, आढळराव पाटलांच्या मनगटावर घड्याळ, अमोल कोल्हे यांना टक्कर देणार!

खर्च काढला, संपर्क नाही म्हणत डिवचलं, राजीनाम्यावरून ऐकवलं

काहीही केले तरी आढळराव पाटील आमच्याकडून पराभूत होत नव्हते. शेवटी सेलिब्रिटी चेहरा म्हणून अमोल कोल्हे यांना २०१९ च्या निवडणुकीच्या आधी मी माझ्या घरी बोलावून घेतले. त्यांना शिरूरमधून लढण्याची कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी मला सांगितले, निवडणुकीचा खर्च मी करणार नाही. दिलीप वळसे पाटील यांनी निम्मा खर्च केला, मी निम्मा खर्च केला. त्यांना फक्त सांगितलं तुम्ही केवळ वेळ द्या, त्यांनी वेळ दिला, निवडून आणले.

शिवाजीराव आढळराव पाटलांचं ठरलं! २६ मार्चला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश निश्चित

पण साडे तीन वर्षातच त्यांनी राजीनाम्याची तयारी केली. त्यावेळी मी त्यांची समजूत काढली. तुम्हाला २५ लाख लोकांनी निवडून दिले आहे. त्यांचा अपेक्षाभंग करू नका, अशी विनंती केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला नाही. पण अख्ख्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवला नाही. यावरून मी बऱ्याचदा बोललो परंतु इतर सेलिब्रिटी उमेदवार मतदारसंघात फारसे नसतात, अशी सबब त्यांनी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed