Sukhoi Fighter Jet Crash: सुखोई हे भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. मात्र, गेल्या बारा वर्षांत आठ वेळा ही विमाने अपघातग्रस्त झाली आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या मल्टिरोल फायटर जेटचा वापर हवाई संरक्षण, लांब पल्ल्याचे हल्ले तसेच पाळत ठेवण्याच्या महत्त्वाच्या मोहिमांसाठी केला जातो. तरीही तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे ही विमाने क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश वेळा वैमानिकांनी ‘इजेक्ट’ करून स्वत:ला सुखरूप केले असले तरी, तीन वैमानिकांना वीरमरण आले आहे. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सुखोई विमानांची उपयोगिता वादातीत आहे. मात्र, नियमित कालावधीनंतर होणाऱ्या अपघातांमुळे सुखोईच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
‘चीनद्वारे हॅकिंगची शक्यता’
सुखोई विमान कोसळण्यामागे चीनचा हात असू शकतो, अशी शक्यता कर्नल (निवृत्त) अभय पटवर्धन यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘सुखोई हे अतिशय उत्कृष्ट विमान आहे. आपले वैमानिकदेखील प्रशिक्षित आहेत. तरीदेखील सातत्याने होत असलेल्या अपघातांमागे चीनचा हात असण्याची शक्यता आहे. तिबेटच्या सीमेवर चीनने गावे वसविली आहेत. अरुणाचल सीमेवर मोठे रेडिओ टॉवर उभे केले आहेत. त्या माध्यमातून या विमानांचा डेटा हॅक करून हे अपघात घडविले जात असावेत. काही वर्षांपूर्वी मी या भागात गेलो होतो, तेव्हा चीन उभारत असलेल्या या टॉवरचे काम जवळपास पूर्ण झाले होते’, अशी माहिती त्यांनी दिली.
असे झाले अपघात…
४ जून २०२४ : नाशिक, महाराष्ट्र (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
२८ जानेवारी २०२३: मध्य प्रदेशात सुखोई अणि मिराज या विमानांची टक्कर (मिराजच्या वैमानिकाचा मृत्यू)
८ ऑगस्ट २०१९ : तेजपूर, आसाम (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
२७ जून २०१८ : नाशिक, महाराष्ट्र (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
२३ मे २०१७ : तेजपूर, आसाम (दोन्ही वैमानिकांचा मृत्यू)
१५ मार्च २०१७ : बाडमेर, राजस्थान (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
१९ मे २०१५ : तेजपूर, आसाम (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
१४ ऑक्टोबर २०१४: पुणे, महाराष्ट्र (दोन्ही वैमानिक सुरक्षित)
