श्रीरंग बारणे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मात्र मतदारसंघात भाजप एकवटली आहे. आम्ही दोनवेळा बारणेंसाठी झटलो, पण आता आम्हाला बारणे उमेदवार नकोत. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनाच उमेदवारी द्या, अशी मागणी बैठकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे.
बाळा भेगडेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या अगोदर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी बारणेंना सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. त्यातच आता स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी देखील भेगडेंसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्याच्या सोमवारपर्यंत शिंदे गटाकडून बारणेंच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र त्या अगोदर बारणेंविरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकांचा धडका सुरू आहे. या बैठकांमुळे बारणे यांची डोकेदुखी वाढणार आहे असे चित्र सध्या तरी पहायला मिळत आहे.
भाजप कार्यकर्ते बारणेंचं काम करणार?
श्रीरंग बारणे यांच्या विरोधात मावळमध्ये वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून बाळा भेगडे यांना उमेदवारी द्या, असा सूर स्थानिक कार्यकर्त्यांकडून निघू लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे काम भाजप कार्यकर्ते करणार की वेगळी भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर
देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक १९ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून ४ जून २०२४ रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.