• Mon. Nov 25th, 2024

    शिवसेना शिंदे गटाच्या पाच जागांवर भाजपचा डोळा, भाजप ‘३०पार’वर ठाम, तिढा लवकरच सुटण्याचे संकेत

    शिवसेना शिंदे गटाच्या पाच जागांवर भाजपचा डोळा, भाजप ‘३०पार’वर ठाम, तिढा लवकरच सुटण्याचे संकेत

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू असून, भाजपने ३० पेक्षा अधिक जागा लढविण्याची भूमिका कायम राखली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या वाट्याला १२ ते १५ जागा येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील जवळपास पाच जागांवर भाजप लढण्याच्या तयारीत असून, त्यात हिंगोली, उत्तर-पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर आणि यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दक्षिण-मध्य मुंबई, कल्याण, हातकणंगले, रामटेक, बुलढाणा, शिर्डी, नाशिक आणि मावळ या जागा विनासायस मिळतील, असे सांगितले जाते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामती, रायगड आणि शिरुर या तीन जागा कोणत्याही परिस्थितीत पाहिजे असल्याचे समजते.

    मोदींचा एकेरी उल्लेख, खोटारडा म्हणत सडकून टीका, प्रकाश आंबेडकरांचं ‘मविआ’ स्टाईल भाषण
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपाबाबत मंगळवारी रात्री उशिरा चर्चा झाली होती. या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर काही निकष समोर ठेऊन त्यानुसार जागावाटप करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी भाजप आणि मित्रपक्षांनी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, यामध्ये कोणत्याही गोष्टींचे अडथळे येता कामा नयेत, यादृष्टीनेच प्रयत्न करण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना जागावाटप करताना जुने निकष लावण्याऐवजी ज्या जागा जिंकता येतील त्याच जागा त्यांना देण्याची भाजपची भूमिका आहे. विशेष म्हणजे, जितके विद्यमान खासदार, तितक्या जागा देण्याचा निकष यावेळी लागू होणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे कळते.

    बैठकीत भाजपकडून झालेले सर्वेक्षण, उमेदवार निवडून येण्याची क्षमता हे मुद्दे लक्षात घेऊन जागावाटप करण्यास अमित शाह यांनी सांगितले. काही जागांसाठी भाजप नेतेही अडून बसल्याची माहिती बैठकीत चर्चेला आली. त्यावर संबंधित ठिकाणी मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता असल्यास भाजपच्या नेत्यांनी हट्ट सोडावा. जागावाटपात कोणावर अन्याय होणार नाही. ४०० चे लक्ष्य घेऊन कामाला लागा, अशा शब्दांत अमित शहा यांनी या नेत्यांचे कान टोचल्याचे समजते. अमित शहा यांच्यासोबत जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून, जागावाटप लवकरच जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘मटा’ला दिली.

    आमच्या सहकार्‍यांना योग्य सन्मानाप्रमाणेच जागा मिळणार, महायुतीच्या जागावाटपावर फडणवीसांचं वक्तव्य!

    ‘मविआ’ची बैठक अनिर्णीत

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बुधवारच्या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यामुळे आता जागावाटपाचा पुढील निर्णय ९ मार्चच्या बैठकीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘मविआ’मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’ला किती जागा द्यायच्या, याचा तिढाही कायम आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *