• Sat. Mar 14th, 2026
    Lakhpati Didi Yojana : ग्रामीण रणरागिणींची दमदार भरारी; 37 लाख ‘लखपती दीदी’, आता 25 लाख नव्या उद्योजकांचं लक्ष्य

    ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करणाऱ्या ‘लखपती दीदी’ योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. २०२५-२६ पर्यंत २५ लाख महिलांना लखपती बनवण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य असून, उमेद अभियानांतर्गत प्रशिक्षणातून महिला उद्योजक घडत आहेत.

    लखपती दीदी योजनेतून राज्य सरकार पुढील पाच वर्षांत 25 लाख महिलांंना सक्षम करणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थकारणाचे चित्र आता वेगाने बदलताना दिसत आहे. केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित न राहता, जिद्दीच्या जोरावर स्वतःचे साम्राज्य उभं करणाऱ्या महिलांना आता ‘लखपती’ होण्याची नवी दिशा मिळाली आहे. राज्य शासनाच्या ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘लखपती दीदी’ उपक्रमाला ग्रामीण भागात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, आगामी २०२५-२६ या वर्षात तब्बल २५ लाख महिलांना या प्रवाहात आणण्याचे लक्ष्य प्रशासनाने निश्चित केले आहे.

    बचत गटांतून उद्योजकतेकडे…

    केवळ बचत करणे आणि कर्ज घेणे इतक्यापुरतीच महिला बचत गटांची व्याप्ती आता उरलेली नाही. ‘लखपती दीदी’ या संकल्पनेमुळे ग्रामीण महिला आता थेट लघुउद्योजक म्हणून समोर येत आहेत. ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या वर जाते, तिला ‘लखपती दीदी’ म्हणून गौरविले जात आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत राज्यातील सुमारे ३७ लाख महिलांनी हा पल्ला गाठला असून, ही आकडेवारी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची साक्ष देणारी ठरत आहे.

    कौशल्याला प्रशिक्षणाची जोड

    या उपक्रमाचे यश केवळ आकड्यांमध्ये नाही, तर त्यामागे असलेल्या प्रशिक्षणात दडलेले आहे. ग्रामीण भागातील महिलांना दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन, अन्न प्रक्रिया, मसाले निर्मिती आणि हस्तकला, कापड व्यवसाय आणि स्थानिक बाजारपेठेला लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन अशा शेतीपूरक उत्पादन आणि लघुउद्योग क्षेत्रांत विशेष पारंगतता मिळवून दिली जात आहे.

    Maharashtra TimesNagpur News: बेपत्ता व्यक्तींची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ५ राज्यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस

    केवळ संबंधित वस्तू तयार करून हा प्रवास थांबत नाही, तर तयार मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि बँकांच्या माध्यमातून खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यावरही ‘उमेद’ने भर दिला आहे.

    कुटुंबाचा आधार अन् निर्णयाची ताकद

    आर्थिक सक्षमीकरणामुळे महिला आता कुटुंबाच्या महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी होऊ लागल्या आहेत. “शासनाच्या योजनांची साथ आणि ग्रामीण महिलांची जिद्द या दोन गोष्टी एकत्र आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळत आहे,” असे प्रशासकीय स्तरावरून सांगण्यात येत आहे. २०२५-२६ या वर्षातील २५ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा हा अध्याय देशासाठी पथदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा