• Mon. Nov 25th, 2024
    कमीत कमी आठ जागा हव्या, राष्ट्रवादी आक्रमक, अजितदादा पुढच्या बोलणीकरिता दिल्लीला जाणार!

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. मात्र दोन्ही बाजूंचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं गणित आणखीनच किचकट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी कालच्या महाराष्ट्र दौऱ्यात महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांनी जागावाटपासंदर्भात चर्चा केली. मात्र या चर्चेनंतर देखील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही.मिळालेल्या माहितीनुसार, भाजप ३६ जागांवर दावा सांगत आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त दोन ते तीन जागा देण्याचा प्रस्ताव अमित शाह यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील एक आकडी जागा देऊन जास्तीत जास्त जागा लढविण्याचा भाजपचा विचार आहे. या संदर्भात अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अमित शाह यांच्या या प्रस्तावावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अमित शाह यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने यासंदर्भातील पुढील खलबतं दिल्लीमध्ये होणार आहेत.
    वंचितच्या भूमिकेने ‘मविआ’तील जागावाटपाचा तिढा वाढला, वाचा बैठकीत नेमकं काय घडलं?

    आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन ते तीन जागा मिळणार असल्याच्या चर्चा सुरू असल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्यात जागा आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. भुजबळ यांची ही मागणी येताच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रफुल्ल पटेल हे दोन दिवसात दिल्लीवारी करणार असून जागावाटपावर चर्चा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला मावळ, बारामती आणि रायगड या जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे.

    प्रकाश आंबेडकरांनी प्रस्ताव दिला, महाविकास आघाडीची भूमिका काय?

    जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्ली येथे होत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते रवाना झाले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीला पोहोचले आहेत. भाजपची ही बैठक होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन प्रमुख नेते दिल्लीवारी करून आपलं म्हणणं मांडणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed