• Sat. Sep 21st, 2024
मावळमध्ये मीच महायुतीचा उमेदवार असणार, पण ‘त्या’ प्रश्नावर श्रीरंग बारणेंचं मौन

मावळ (पुणे): लोकसभा निवडणुकांमुळे सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील लोकसभेच्या जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तरी, उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मावळचा उमेदवार भर सभेत जाहीर केल्यानंतर आता महायुतीकडून मावळ लोकसभेचा उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मीच महायुतीचा उमेदवार असणार आहे, असे ठामपणे सांगितले आहे. मात्र, उमेदवार कुठल्या पक्षावर निवडणूक लढणार याबाबत मात्र बारणे यांनी बोलणे टाळले आहे. मात्र, याला आमदार सुनील शेळके यांनी विरोध दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारणे कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? यावर मी महायुतीचा उमेदवार असेल, असं म्हणत बारणेंनी गुप्तता कायम ठेवली आहे. बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने ही विरोध दर्शविला आहे. भाजपन मावळची जागा ही अजित पवार गटाला सोडण्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नेमक्या कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल याबाबत बारणेंनाही निश्चितता नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या कमळावरचा उमेदवार असायला हवा, मग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्याच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभेत सुरू होती. अशातच मी महायुतीचा उमेदवार असेन, असं म्हणत बारणेंनी आणखी संदिग्धता वाढवली आहे.

ज्या उमेदवाराचा मतदारसंघात थांगपत्ता नाही, त्या उमेवाराबद्दल मी बोलणार नाही, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभेच्या लोकप्रतिनिधींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

बारणेंच्या उमेदवारीला सुनील शेळकेंचा विरोध

मीच महायुतीचा उमेदवार असेल असे माध्यांनशी बोलताना श्रीरंग बारणे यांनी सांगितले आहे. मात्र, या उमेदवारीला सुनील शेळके यांनी विरोध दर्शवला असून राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, आता श्रीरंग बारणे हे थेट मीडिया समोर आपणच महायुतीचे उमेदवार असल्याची वल्गना करू लागले आहेत. त्यामुळे मावळच्या महायुतीच्या उमेदवारीबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed