• Thu. Mar 19th, 2026

    Mumbai Mayor News: मुंबईच्या महापौरांकडून मोदींच्या सूचनेला हरताळ? गाडीवर लाल-निळे लखलखणारे दिवे, VVIP ट्रीटमेंटची जोरदार चर्चा

    Mumbai Mayor News: मुंबईच्या महापौरांकडून मोदींच्या सूचनेला हरताळ? गाडीवर लाल-निळे लखलखणारे दिवे, VVIP ट्रीटमेंटची जोरदार चर्चा

    BMC News: महापौरांच्या गाडीसोबत पीए, सुरक्षा रक्षक आणि शिपायांसाठी असलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या टॉपवरही लाल-निळ्या रंगाचे दिवे बसवले आहेत.

    महापौरांची गाडी आता ‘व्हीव्हीआयपी’(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हीआयपी’ संस्कृती संपुष्टात आणल्यानंतर मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवे बंद झाले. त्यामुळे महापौरांच्या गाडीवरील लाल दिवाही काढण्यात आला. मात्र चार वर्षांनी मुंबईला महापौर मिळाल्यानंतर सत्तेत असलेल्या महायुतीच्या महापौरांना मात्र व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळू लागल्याची जोरदार चर्चा मुंबई महापालिकेत आहे.

    महापौर रितू तावडे यांच्या आलिशान गाडीला समोरून लाल-निळे लखलखणारे दिवे बसवले आहेत. उपमहापौरांना असलेल्या सुरक्षारक्षकासह पीएसच्या नव्या स्कॉर्पिओ गाडीच्या टॉपवरही लखलखणारे लाल-निळे दिवे बसविले आहेत.

    एप्रिल २०१७ मध्ये केंद्र सरकारने गाडीवर लाल दिवा वापरावर बंदी आणली. त्यामुळे अनेक मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लखलखणारे लाल दिवे काढण्यात आले. याची अंमलबजावणी १ मे २०१७ पासून करण्यात आली, ती आजपर्यंत सुरूच आहे. या निर्णयानंतर मुंबई महापौरांच्या गाडीसाठी वापरण्यात येणारा लाल दिव्याचा वापरही बंद झाला. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सलग नऊ वर्षे अशाप्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट बंद होती. काही मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून त्याचा वापर करताच टीका होऊ लागली.

    मात्र यावर शक्कल लढवून मुंबई महापौरांच्या गाडीला समोरच्या बाजूस लखलखणारे लाल-निळे दिवे बसवण्यात आले आहेत. प्रथम नागरिक असलेल्या मुंबई महापौरांना अनेक विविध कार्यक्रमांना वेळेत पोहोचावे लागते. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल किंवा परदेशातील मंत्री आल्यास त्यांच्या स्वागतासाठी वेळेत पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळे एक राजशिष्टाचार म्हणून त्यांच्या गाडीच्या पुढील बाजूस आणि सोबत असणाऱ्या ताफ्यातील वाहनाला लखलखणारे लाल निळे दिवे बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यावर महापालिकेतील कोणीही बोलण्यास तयार नाही. मुंबई महापौरांच्या ताब्यात पुन्हा एकदा व्हीआयपी संस्कृती आल्याची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा