Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगडमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. एका वृद्धाचं अपहरण करुन लाखोंची उकळपट्टी केली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून संपर्क
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील सुनील दयाराम गजघाटे या वृद्ध नागरिकाशी अदिती ढोके हिने फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला. समाजकार्याच्या नावाखाली ओळख वाढवत दोघेही आंबेडकरी समाजातील असल्याचं सांगून तिने त्यांचा विश्वास संपादन केला. काही दिवसांच्या संभाषणानंतर तिने गजघाटे यांना कर्जत येथे भेटण्यासाठी बोलावले. 8 मार्च रोजी गजघाटे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना अदिती ढोके हिने त्यांना कर्जत रेल्वे स्थानकावर उतरायला सांगितलं. त्यानंतर भिसेगाव येथील एका दुकानाजवळ त्यांना बोलावण्यात आलं. तेथे त्यांना एका कारमध्ये बसवण्यात आलं. या गाडीत सुशील जाधव आणि गणेश प्रधान हे दोघे उपस्थित होते. तिघांनी मिळून गजघाटे यांना धमकावत त्यांचं अपहरण केलं आणि गुंडगे येथील एका घरात नेऊन त्यांना कैद करून ठेवलं.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांवर टीका, सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमावलीचा भंग केल्याचा आरोप; स्थगन प्रस्तावाबाबत अखेर डॉ. दीपक पवारांना दिलासा
दमदाटी करुन विवस्त्र केलं
यानंतर आरोपींनी दमदाटी करत गजघाटे यांना विवस्त्र करून मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन कर्ज काढण्यास भाग पाडले. त्यांच्या खात्यातील रक्कम तसेच ऑनलाइन ‘क्विक लोन’च्या माध्यमातून मिळालेल्या पैशांपैकी मोठी रक्कम आरोपींनी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली. याशिवाय एटीएमद्वारेही पैसे काढण्यात आले. रोख रक्कम, मोबाईल, सोन्याची चैन आणि अंगठी असा मुद्देमाल हिसकावून आरोपींनी सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
Pune Metro: मेट्रोतून उतरलं की रिक्षा तयार! पुण्यातील ‘नळ स्टॉप’ मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा; किती असेल भाडे?
‘बंटी-बबली’कडून याधीही असाच प्रकार
दरम्यान, 8 मार्चच्या पहाटेच्या सुमारास गजघाटे यांनी ज्या घरात त्यांना कैद करून ठेवलं होतं तेथून कसाबसा पळ काढला आणि नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर 10 मार्च रोजी त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तोशीफ सय्यद यांच्या पथकाने तपास सुरू करून अदिती ढोके व सुशील जाधव यांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपी गणेश प्रधान याचा शोध सुरू असून या ‘बंटी-बबली’ जोडीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना जाळ्यात अडकवून फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कर्जत पोलिसांनी केले आहे.
