• Sat. Sep 21st, 2024
खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले

छत्रपती संभाजीनगर : पुण्यात चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. त्याचे धागेदोरे पंजाब, दिल्लीपर्यंत सापडले आहेत. पुण्याचा पालकमंत्री असल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेत पोलिस खात्याचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी विरोधक खच्चीकरण करीत आहेत. सत्ताधारी आमदाराने पोलिस ठाण्यात केलेला गोळीबार आणि दोन मित्रांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन विरोधक पातळी सोडून टीका करीत आहेत. कुणी खालच्या पातळीवर टीका केली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ते, प्रवक्त्यांनी संयम बाळगून बोलावे. आपल्या बोलण्यामुळे कुणाला सहानुभूती मिळू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मिटमिटा येथे शुक्रवारी दुपारी राज्यव्यापी संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, अमरसिंह पंडित, प्रशांत कदम, सुरेश बनसोडे, कल्याण आखाडे, रेखा हिवाळे, कल्पना अहिरे, अभिजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो. काही कारणांनी ते सरकार पडले. आता महायुती सरकारमध्ये आहोत. आम्ही सत्तेचे हपापलेले कधीच नव्हतो. पण, ज्या मतदारसंघाचे, राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतो त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी सत्ता गरजेची असते. केवळ बहुजनांच्या हितासाठी आम्ही सत्तेत आहोत’, असे पवार म्हणाले.
ठाकरेंपासून मनाने दुरावलो, मैत्री उरलेय का त्यांनाच विचारा; देवेंद्र फडणवीसांच्या भावना
आता लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम सुरू असल्याचा अपप्रचार सुरू होईल. मुंबईतील महाराष्ट्रीय मतांसाठी हा डाव खेळला जातो. पण, मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. पिछाडीवर राहिलेल्या समाजाला आरक्षण देण्याबाबत दुमत नाही. पण, आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. शेवटी समतेचा विचार पाहिजे. बेरजेचे राजकारण करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसशी लहान घटक जोडणे कार्यकर्त्यांचे काम आहे’, असे पवार म्हणाले.
धैर्यशील माने, थांबता का बघा; सदाभाऊ खोत यांचं जाहीर आवाहन; बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचाही तुम्हालाच पाठिंबा
‘अदृश्य शक्ती म्हणून टीका करणाऱ्यांना विकासकामाद्वारे उत्तर मिळाले आहे. संविधानाचा आधार घेऊनच न्यायालय आणि निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असल्याचे अधोरेखित झाले’, असे यावेळी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुनील तटकरे म्हणाले.

आमचं घड्याळ न पाहता तुतारी कशी वाजते तेच पाहू; अजितदादांच्या कार्यकर्त्यांचं शरद पवार गटाला आव्हान

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांच्यावर टीका होते. ते हिंदुत्वाकडे वळल्याचे विरोधक सांगतात. पण, त्यांची वाटचाल फुले-शाहू-आंबेडकरी विचारांवर सुरू आहे. मुंब्रा ते जामखेडपर्यंत अजितदादांवर टीका सुरू आहे. तर अजितदादा कामातून पुढे जात आहेत, असे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

आव्हाडांनी तुतारी वाजवावी

काहीजण संविधानाचे नाव स्टेजवर घेतात. मात्र, दुसरीकडे करमुसेसारख्या गरीब व्यक्तीला मारहाण करतात. या प्रकारचे काम राष्ट्रवादी काँग्रेस कधी खपवून घेत नाही. आम्ही दादांच्या शिस्तप्रिय विद्यापीठात काम करणारे विद्यार्थी आहोत. तुतारीला कालपासून मार्केट आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी. एक लाख रुपये बक्षिस देऊ. फक्त आवाज तुतारीतून आला पाहिजे, अशी खोचक टीका विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed