• Sat. Sep 21st, 2024

भाजपने ‘दाग अच्छे है’ टॅगलाइन लावावी; आदित्य ठाकरेंचा फोडाफोडीवरुन टोला

भाजपने ‘दाग अच्छे है’ टॅगलाइन लावावी; आदित्य ठाकरेंचा फोडाफोडीवरुन टोला

म.टा.वृत्तसेवा, नाशिकरोड: राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. युवकांना रोजगार नाही. जाती- जाती, धर्मा-धमांमध्ये भांडणे लावली जात आहेत. मोठे उद्योग गुजरातला जात आहेत. उद्या महाराष्ट्राचे मंत्रालयही गुजरातला जाईल. एकच उद्योग महाराष्ट्रात जोरात सुरू आहे, तो म्हणजे पक्ष फोडा, घराणी फोडा. दुसऱ्या पक्षातील भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये सर्रास प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे भाजपने क्लिन पक्ष ही आपली टॅगलाइन बदलून ‘दाग अच्छे है’ ही टॅगलाइन करावी, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला.

आदित्य यांची जेलरोडला जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. व्यासपीठावर वरुण सरदेसाई, विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, जयंत दिंडे, देवानंद बिरारी, सुनील बोराडे, भारती ताजनपुरे, मंगला आढाव, प्रशांत दिवे, गणेश गडाख आदी उपस्थित होते.

उत्तर भारतातील शेतकरी आंदोलनाचा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले की, पाऊस पडत नाही पण शेतकऱ्यांचे अश्रू शेतात पडत आहेत. केंद्र सरकारने आश्वासने पाळावीत या मागणीसाठी दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांवर दडपशाही सुरू आहे. हे शेतकरी स्वतंत्र राज्य मागत नाहीत. चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार सुरू आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने जंगी फौज लावली आहे. अतिरेकी, चीनविरुध्द ही ताकद वापरण्याऐवजी शेतकऱ्यांविरुध्द ती वापरली जात आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली. पण शिंदे सरकारची पोहचली नाही, असेही ते म्हणाले.

भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांच्या डोक्यावर उपरे बसवले, अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल

‘भाजपवाल्यांनी सेनेत यावे’

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा संदर्भ आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने घराणी फोडली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस पक्ष फोडला. या फुटिरांना मंत्री केले. आता भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजप आपल्याच प्रामाणिक कार्यकत्यांवर अन्याय करत आहे. या अन्यायग्रस्तांनी शिवसेनेत यावे. दरम्यान, या सभेत माजी आमदार योगेश घोलप यांचे नाव असलेली खुर्ची होती. पण योगेश घोलप सभेला अनुपस्थित राहिले. विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, वसंत गिते, दत्ता गायकवाड यांचीही भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed