• Sat. Sep 21st, 2024

रत्नागिरीच्या मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ

रत्नागिरीच्या मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ

रत्नागिरी: अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून आज प्राणप्रतिष्ठपनपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ मूळचे रत्नागिरी लांजा येथील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी झाला आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सुरू आहे. तेथील सर्व विधी कृष्णयजुर्वेदीय पद्धतीनुसार होणार आहेत. मात्र, चार वेदांपैकी पहिला ऋग्वेद हा ब्रह्मदेवाच्या चार मुखांपैकी पूर्वेकडील मुखातून प्रकट झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे श्रौत आणि स्मृती या दोन्ही विधींमध्ये ऋग्वेद मंत्रांनीच देवतांचे प्रथम आवाहन केले जाते. दशरथ राजाने केलेल्या पुत्रकामष्टी यज्ञाचा प्रारंभही ऋग्वेदातील मंत्रांसह करण्यात आला होता.

या मंत्रोच्चारांसाठी मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली देशभरातील ११ ब्रह्मवृंदांना निमंत्रित करण्यात आले आहे. श्री. मोघे हे मूळचे कोलधे (ता. लांजा) येथील रहिवासी असून त्यांचे पूर्वज गुजरातमधील बडोदा येथील गायकवाड संस्थानात स्थायिक झाले.

तेथेच वेदमूर्ती हेमंत मोघे यांचा जन्म १९५९ साली बडोदा येथे झाला. त्यानंतर शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर स्मार्त याज्ञिक असा दुहेरी अभ्यास करून मार्च १९७६ मध्ये जुनी अकरावी एसएससी झाल्यानंतर त्यांनी स्मार्त याज्ञिकदेखील पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी श्री. वेदमूर्ती भट गुरुजी (पावसनजीक मावळंगे), वेदमूर्ती पाध्ये गुरुजी (कोलधे), बडोदा येथील वेदमूर्ती पित्रे गुरुजी यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी वाराणशीला जाण्याचा निर्णय घेतला.

लक्ष्मण शास्त्री द्रविड, शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती यांच्या मार्गदर्शनातून तेथे १९२१ साली साकारलेल्या श्री वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात ते दाखल झाले. तेथे वेदमूर्ती पुणतांबेकर गुरुजी यांच्याकडे त्यांनी ऋग्वेद संहितेचे अध्ययन पूर्ण केले.

त्यानंतर गेली वीस वर्षे ते ऋग्वेदाचे अध्यापक आहेत. ते सहा महिने बडोद्यात, तर सहा महिने वाराणसी येथे जाऊन अध्यापन करतात. तेथील कृष्ण यजुर्वेदीय गणेशशास्त्री यांना अयोध्येत ऋग्वेद मंत्रोच्चारांसाठी प्रमुख म्हणून पाचारण करण्यात आले होते. ती जबाबदारी त्यांनी हेमंत मोघे गुरुजींकडे सोपविली. त्यानुसार ते अयोध्येला रवाना झाले. आज सकाळी त्यांच्या नेतृत्वाखालील देशभरातील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद मंत्रोच्चारांनी राममूर्ती प्राणप्रतिष्ठपनपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed