पूर्वी ज्येष्ठ नागरिकांत
पूर्वी हाडांचे विकार ५० ते ६० या वयोगटातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत होते. मात्र, गेल्या काही वर्षांध्ये २५ ते ३५ या वयोगटातील तरुणांमध्ये हाडे ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरेसिस) यासह विविध हाडांचे विकार वाढल्याचे निरीक्षण अस्थिरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. व्यायामाच्या अभावामुळे हाडांचे विकार वाढल्याने नियमित व्यायाम करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
‘लठ्ठपणामुळे परिणाम’
ऑर्थेपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट म्हणाले, ‘व्हिटॅमिनची कमतरता, हाडांचा ठिसूळपणा यामुळे सांधे निकामी होण्यास सुरुवात होते. नियमित व्यायाम, वजन व आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास सांध्यांवर येणारा भार कमी करून सांधे आणि स्नायू बळकट ठेवता येऊ शकतात. बैठी जीवनशैली, लठ्ठपणा यामुळे हाडांच्या आणि सांध्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.’
‘मणक्याच्या समस्येत वाढ’
ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन डॉ. शार्दुल सोमण म्हणाले, ‘बैठ्या जीवनशैलीमुळे सध्या तरुणांमध्ये मणक्याची समस्या वाढताना दिसत आहे. व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचालींवर मर्यादा यामुळे स्पाइनमधील आर्थराइडची समस्या वाढत आहे. दर महिन्याला साधारणतः ३०-३५ रुग्ण पाठीत दुखत असल्याच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येतात.’
काय काळजी घ्यावी?
– नियमित व्यायाम करणे.
-संतुलित आहार घेणे.
– वजन कमी करणे.
– हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
हाडे ठिसूळ होण्याची सुरुवातीची लक्षणे
– हाडे सहजपणे फ्रॅक्चर होतात.
– पाठदुखी, हाडे दुखणे या समस्या उद्भवतात.
– हिरड्या आणि दात कमकुवत होणे.
गेल्या काही वर्षांमध्ये बैठ्या जीवनशैलीचे प्रमाण वाढल्याने कमी वयात हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. २० ते २५ वयोगटातील तरुणांनाही हाडांचे विकार होत असल्याचे दिसत आहे. योग्य प्रकारचा आहार आणि नियमित व्यायाम केल्यास हाडांचे विकार रोखता येऊ शकतात.- डॉ. मिलिंद मोडक, अस्थिरोग तज्ज्ञ