नागपुरात डिसेंबर कडाक्याच्या थंडीचा समजला जातो. मात्र, अद्यापही थंडीची भट्टी जमलेली नाही. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमीदाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या आठवड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला होता. आता परत एकदा विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मिग्जॉम’ हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे तयार होणारा हवेतील ओलावा पूर्व विदर्भापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान खात्यानुसार, दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी गोंदियात तुरळक सरींची हजेरी लागली. त्यामुळे, पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणी ची कामे तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील २-३ दिवसांसाठी पुढे ढकलावी, असा सल्ला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दिला आहे. तसेच गहू, मोहरी, जवस, फळबागा तसेच भाजीपाला पिकामध्ये ओलित करणेसुद्धा २-३ दिवसांसाठी पुढे ढकलावे. कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा, असाही सल्ला देण्यात आला आहे.
अधिवेशनात थंडी वाढणार
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरून नागपुरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मात्र, ७ डिसेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुढे ८ डिसेंबरपासून वातावरण कोरडे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात तापमानात काही अंशांची घसरण होऊन थंडीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधीत थंडी वाढण्याची शक्यता आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News