• Sat. Sep 21st, 2024

हक्काच्या पाण्यासाठी उद्या ‘रास्ता रोको’; मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन

हक्काच्या पाण्यासाठी उद्या ‘रास्ता रोको’; मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध होत असल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या पुढाकाराने सोमवारी २० नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे,’ अशी माहिती समितीचे सदस्य, माजी मंत्री अनिल पटेल यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

‘मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे यांच्यासह राजकीय मंडळींनी मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. राज्य सरकारनेही या बाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात सोमवारी जालना रस्त्यावरील सिंचन भवनासमोर रास्ता रोको केला जाईल. त्यासाठी मराठवाड्यातून सर्वपक्षीय नेते, मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह नागरिक उपस्थित राहतील,’ असे पटेल यांनी सांगितले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी सभापती विलास भुमरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ, कैलास तवार, विनोद तांबे, नंदकिशोर नजन आदी उपस्थिती होते.

पटेल म्हणाले, ‘मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र आली आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, सुरेश जेथलिया, रामप्रसाद बोर्डीकर, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह मराठवाड्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींची आमची चर्चा झाली. नगर व नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध होत आहे. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत; पण तिकडच्या मंडळींनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातूनही याचिका दाखल केल्या आहेत.’

मराठवाड्याच्या तोंडचं पाणी पळवण्याचा घाट? पाईप लाईनवर मातीऐवजी मोठ्ठे दगड, भविष्यात पाणीगळती होण्याची भिती

मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी १९ नोव्हेंबर रोजी शहरात एका विवाह समारंभासाठी येत आहेत. त्या वेळी मराठवाडा पाणी जन आंदोलन समिती व सर्वपक्षीय नेतेमंडळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत चर्चा करणार आहेत,’ असे विलास भुमरे यांनी सांगितले.

भाजपचे नेते अनुपस्थित

पत्रकार परिषदेसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींना बोलाविण्यात आले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. याबाबत विचारता अनिल पटेल म्हणाले, ‘मी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना निमंत्रण दिले होते.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed