• Sat. Sep 21st, 2024

कांदालागवड अर्ध्यावरच; नाशिक विभागात तीनही हंगामात मोठी घट, ‘ड्राय स्पेल’चा परिणाम

कांदालागवड अर्ध्यावरच; नाशिक विभागात तीनही हंगामात मोठी घट, ‘ड्राय स्पेल’चा परिणाम

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील बहुतेक तालुक्यांमध्ये पावसाअभावी एक महिन्याहून अधिक कालावधीचा ‘ड्राय स्पेल’ गेल्याने खरीप हंगाम वाया गेला. या ड्राय स्पेल (कोरड्या हवामानाचा दीर्घ कालावधी) चा मोठा फटका विभागातील लाल कांद्याच्या लागवडीला बसला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरीप, लेट खरीप आणि रब्बी कांदा मिळून लागवडीच्या क्षेत्रात तब्बल ४६.०४ टक्के इतकी प्रचंड घट आली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, नाशिक विभाग लाल कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. २०२२-२३ या वर्षी नाशिक विभागात खरीप ४० हजार ६०४ हेक्टर, लेट खरीप ५७ हजार ९१७ हेक्टर, तर रब्बी २ लाख ४८ हजार ४१८ हेक्टर अशा एकूण ३ लाख ४६ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती. या कांदा लागवडीच्या तुलनेत २०२३-२४ या वर्षी नाशिक विभागात खरीप कांद्याची अवघ्या १९ हजार ९१९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. त्यामुळे या कांद्याचे लागवडीचे क्षेत्र तब्बल ५१ टक्क्यांनी म्हणजेच २० हजार ६८५ हेक्टर इतके घटले आहे.

…अशी आहेत महत्त्वाची निरीक्षणे

– लेट खरीपाची लागवडही २७ टक्क्यांनी अर्थात १५ हजार ६५२ हेक्टरने घटून अवघी ४२ हजार २६५ हेक्टर
– रब्बी कांदा लागवडीच्या क्षेत्रातही कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ४९ टक्के इतकी मोठी घट अपेक्षित
– यंदा रब्बी कांदा लागवड १ लाख २५ हजार हेक्टर इतकीच, १ लाख २३ हजार ४१८ हेक्टर क्षेत्र घटले
– तीनही प्रकारच्या लाल कांद्याची १ लाख ८७ हजार १८४ हेक्टर अर्थात ५३.९५ टक्के इतकी लागवड
– १ लाख ५९ हजार ७५५ हेक्टर अर्थात ४६.०४ टक्के इतकी लागवड कमी झाली

उत्पादकतेवरही होणार परिणाम

परतीचा मान्सूनदेखील न बरसल्याने नाशिक विभागातील दुष्काळसदृश महसूलमंडळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. पाणीटंचाईमुळे लाल कांद्याची प्रतिहेक्टरी उत्पादकतादेखील घटणार आहे. हे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रतिहेक्टरी २ मेट्रिक टन इतके राहण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. परिणामी, कांदा उत्पादन घटून कांद्याचे दर गगनाला भिडण्याची दाट शक्यता आहे.
कांद्याने रडवलंच! इजिप्तकडून कांदा निर्यातीवर बंदी, स्थानिक बाजारपेठेत भाव पुन्हा वाढणार
विभागाची कांदा लागवडक्षेत्र प्रगती…
हंगाम—खरीप—लेट खरीप—रब्बी
२०२२-२३ क्षेत्र हेक्टर—४०,६०४—५७,९१७—२,४८,४१८
२०२२-२३ उत्पादन (लाख मेट्रिक टन)—५.७७—१०.१९—५८.६३
२०२२-२३ उत्पादकता (मेट्रिक टन)—१४.२०—१७.५९—२३.६०

२०२३-२४ क्षेत्र हेक्टर—१९,९१९—४२,२६५—१,२५,०००
२०२३-२४ उत्पादन (लाख मेट्रिक टन)—२.५९—६.४५—२६.२५
२०२३-२४ उत्पादकता (मेट्रिक टन)—१२.९८—१५.२६—२१.००
अपेक्षित घट टक्केवारी—५१—२७—४९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed