मुंबईत रविवारीही कमाल आणि किमान तापमान चढे होते. कुलाबा येथे ३५.५, तर सांताक्रूझ येथे ३६.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. शनिवारच्या तुलनेत सांताक्रूझ येथे कमाल तापमान एका अंशाने उतरले. परंतु त्याचा काही फरक जाणवला नाही, असे मुंबईकरांचे म्हणणे होते. कुलाबा येथील तापमानात शनिवारच्या कमाल तापमानापेक्षा ०.५ अंशांनी वाढ झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.२ अंशांनी अधिक होते. मुंबईमध्ये आर्द्रताही कायम आहे. परिणामी किमान तापमानामुळेही दिलासा मिळताना दिसत नाही. कुलाबा येथे रविवारी पहाटे २७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे २६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. दोन्ही ठिकाणी किमान तापमानात शनिवारीपेक्षा ०.५ अंशांची वाढ नोंदली गेली. कुलाबा आणि सांताक्रूझ येथील किमान तापमान अनुक्रमे २.३ आणि २.४ अंशांनी सरासरीपेक्षा अधिक होते.
समुद्रावरून येणारे वारे सध्या दुपारनंतर वाहत असल्याने तापमान चढे आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली. तसेच सध्या आभाळ निरभ्र असल्याने सूर्यकिरणेही थेट जमिनीपर्यंत पोहोचत आहेत. याचाही प्रभाव मुंबईच्या तापमानावर होतो. मुंबईवर हा प्रभाव आठवडाभर कायम असेल. ऑक्टोबर महिना संपल्यानंतर यात थोडा फरक पडू शकेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला.
मुंबईसह एकूण कोकण विभागात सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने कमाल तापमान अधिक असल्याचे दिसत आहे. हर्णे येथे रविवारी सरासपीपेक्षा ३.४ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना उशीर होत असल्याने कोकण विभागात तापमान सध्या चढे असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. सध्या विदर्भामध्ये बुलढाणा आणि यवतमाळ वगळता सरासरी आणि कमाल तापमानात मोठी तफावत आढळून आली नाही. कोकण विभागात एकंदर उन्हाचा ताप जास्त जाणवत असला, तरी हा ताप ऋतुमानाप्रमाणेच आहे. सरासरी ऋतुमानापेक्षा आत्ताचे तापमान खूप चढे नाही. सर्वसाधारण ऑक्टोबरमध्ये असाच उकाडा जाणवतो. वातावरणीयदृष्ट्या हे सर्वसाधारण वातावरण असल्याने चिंतेचे कारण नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.