• Sat. Sep 21st, 2024

हिरवी मिरची आणखीन ‘तिखट’! भाव १० ते २० टक्क्यांनी वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

हिरवी मिरची आणखीन ‘तिखट’! भाव १० ते २० टक्क्यांनी वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेते या रविवारी (२२ ऑक्टोबर) फळभाज्यांची आवक कमी झाली. परिणामी कांदा, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, बीटच्या दरांत दहा ते वीस टक्के वाढ झाली. अन्य भाजीपाल्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर आहेत.

मार्केट यार्डात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे सात ते आठ टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून दोन ते तीन टेम्पो शेवगा, इंदूरमधून दोन टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा तीन ते चार टेम्पो, गुजरात येथून भुईमूग शेंग तीन टेम्पो, कर्नाटक येथून पावटा तीन टेम्पो, मध्य प्रदेश येथून सुमारे सहा ते सात टेम्पो लसणाची आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, भेंडी पाच ते सहा टेम्पो, गवार पाच ते सहा टेम्पो, टोमॅटो सुमारे नऊ ते १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो, काकडी सात ते आठ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी चार ते पाच टेम्पो, सिमला मिरची आठ ते १० टेम्पो, भुईमूगाच्या शेंगांची सुमारे ४० ते ५० गोणी, कांदा सुमारे ७५ ते ८० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ६० ट्रक आवक झाल्याची माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

पालेभाज्यांचे दर स्थिर

कोथिंबिरीची एक लाख ५० हजार जुडी आणि मेथीच्या ५० हजार जुड्यांची आवक झाली. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक आणि मागणी सारखी असल्याने पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

उपवासामुळे फळांना मागणी

नवरात्रातील उपवासामुळे फळांची मागणी वाढली आहे. डाळिंब, कलिंगड, खरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. फळबाजारात रविवारी केरळ येथून अननस न ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्रा ३० ते ४० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई सात ते आठ टेम्पो, लिंबांची सुमारे एक ते दीड हजार गोणी, कलिंगड चार ते पाच टेम्पो, खरबूज पाच ते सहा टेम्पो, पेरू ६०० ते ७०० क्रेट्स, सीताफळ सात ते आठ टन, चिक्कू दोन हजार बॉक्स, सफरचंदाच्या चार ते पाच हजार पेटींची आवक झाली.
दसऱ्यानिमित्त फुलांची मागणी वाढली, पण झेंडूच्या फुलाला कवडीमोलाचा दर, किलोला किती भाव?
मासळीची मागणी घटली

गणेश पेठेतील मासळी बाजारात सर्व प्रकारच्या मासळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. नवरात्रामुळे मासळीला मागणी नसल्याने दर स्थिर आहेत. इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ३० रुपयांनी आणि गावरान अंड्यांच्या शेकडा दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. मटण, चिकनचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची सुमारे १०० ते २०० किलो, नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन आवक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed