• Sat. Sep 21st, 2024

Nashik Police: ड्रग्ज तपासासाठी नाशिक पोलिसांची ‘ॲक्शन फोर्स; अशी आहे अधिकाऱ्यांची रचना

Nashik Police: ड्रग्ज तपासासाठी नाशिक पोलिसांची ‘ॲक्शन फोर्स; अशी आहे अधिकाऱ्यांची रचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरात एमडी (मेफेड्रॉन) तस्करीसंदर्भात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा सखोल तपास करून ड्रग्जची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने विश्लेषणात्मक तपासाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकासह (एनडीपीएस) इतर पथकांतील ९ अधिकाऱ्यांसह ३५ अंमलदारांची तात्पुरती नेमणूक केली आहे. त्यातील आठ गटांची ‘अॅक्शन फोर्स’ ड्रग्जचा बीमोड करण्यासाठी शहरात कार्यान्वित झाली आहे.

सामनगाव येथे १२ ग्रॅम, वडाळा गावात ५२ ग्रॅम, आणि नाशिकरोडच्या शिंदे गावातील कारखान्यात चार किलो एमडी नाशिक पोलिसांनी हस्तगत केले आहे. या तीन गुन्ह्यांचा तपास एनडीपीएस पथक करीत आहे. या पथकाच्या जोडीला सखोल तपासासाठी आठ गट नेमण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे हे वेळोवेळी देखरेख करून माहिती घेत आहेत. तर, आतापर्यंत नाशिक पोलिसांनी दहा संशयितांना अटक केली आहे. त्यांना एमडी पुरविणाऱ्यांचाही पथके शोध घेत आहेत. तपासकामात सुसूत्रता येण्यासह वेगाने कामगिरी होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

…अशी आहे रचना

तीनही गुन्ह्यांचा एकत्रित तपास व कागदपत्रे तयार करण्याचे काम एनडीपीएसचा एक सहायक निरीक्षक तसेच ९ अंमलदार करतील. तपास पथकात एक अधिकारी व चार अंमलदार, कारखाने तपासणीसाठी एका अधिकाऱ्यासह पाच अंमलदार, तांत्रिक माहितीसाठी एक अधिकारी व दोन अंमलदार, तांत्रिक विश्लेषणासाठी एका अधिकाऱ्यासह तीन अंमलदार, अटकेतील संशयितांच्या चौकशीसाठी एका अधिकाऱ्यासह तीन अंमलदार नेमण्यात आले आहेत. यासह संशयितांचा शोध घेण्यासाठी दोन गटांत तीन अधिकाऱ्यांसह अकरा अंमलदार कार्यरत आहेत. या ‘ॲक्शन फोर्स’ने शहरात कामगिरीला सुरुवात केली आहे.

पथकांनुसार गट व कार्यवाही (एमडी प्रकरण)
प्रमुख : वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, एनडीपीएस

– दाखल गुन्ह्याचा योग्य तपास व कागदपत्रे तयार करणे
– गुन्ह्याच्या घटनास्थळांच्या मालकांचा शोध, कागदपत्रे हस्तगत करणे, परिसरातील नागरिकांचे जबाब, कारखान्यांची कागदपत्रे तपासणी
– अंबड, सातपूर व इतर परिसरातील बंद कारखाने व इतर गोदाम तपासून अवैध व्यवसाय सुरू असल्यास कारवाई
– संशयितांच्या बँकांचे व्यवहार, सोशल मीडिया अकाउंटसह इतर तांत्रिक पुरावे संकलित करणे
तरुणांची मागणी, कारमध्ये हत्यारं अन् ५० लाखांची कमाई; ड्रग्ज माफिया प्रकरणात धक्कादायक उलगडा
प्रमुख : वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हे युनिट-१
– तांत्रिक विश्लेषण : गुन्ह्यांच्या अनुषंगाने सीडीआर हस्तगत करून विश्लेषण
– संशयितांची चौकशी : संशयितांची माहिती मिळवून डेटा तयार करणे
– संशयितांचा शोध : संशयितांना ताब्यात घेऊन तपास अधिकाऱ्यांकडे हजर करणे

अमली पदार्थविरोधी पथकासह गुन्हे विभागांतर्गत असलेली चार पथके व गुन्हे युनिट एकच्या अधिकारी व अंमलदारांचे दोन पथकांत विभागून आठ गट केलेले आहेत. प्रत्येकाला कामे व कारवाई विभागून दिल्याने त्याचा एमडीच्या तपासासह शहरातील नियंत्रणावर प्रभावी परिणाम दिसेल.- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed