सप्टेंबरचे तीन आठवडे पावसाने दडी मारली असली तरी पुढील आठवडा पावसाचा ठरणार आहे. आयएमडी पुणे कार्यालयातील हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, प्रामुख्याने रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर भागातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस शक्यता असल्याने आम्ही ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
येत्या २५ आणि २६ सप्टेंबरला मात्र राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहणार आहे. दिवसभरात हलका ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच सोमवार आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कश्यपी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर उकाडाही वाढला होता. चारच्या सुमारास ढग दाटून आले आणि सुरुवातीला उपनगरांत, काही वेळातच संपूर्ण शहरात चौफेर पाऊस पडला. अचानक जोराच्या सरी आल्याने रस्त्यावर कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही हातातील कामे अर्धवट ठेवून मांडवाच्या सुरक्षेची चाचपणी केली.