Baramati News: अपघातानंतर जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे बारामतीकडे जाणारी आणि येणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली.
या अपघातात मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) यांचा मृत्यू झाला. ते मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री काम आटोपून ते घरी परतत असताना जळगाव क.प.जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या राज्य मार्गावर अद्याप गतिरोधक बसवण्यात आलेले नसल्यामुळेच वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याच निषेधार्थ जळगाव क.प येथे त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित चालकाविरोधात आवश्यक कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी सांगितले. कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेल्या जगताप यांच्या आकस्मिक निधनामुळे भिलारवाडी आणि मेडद परिसरात शोककळा पसरली आहे.
