Mumbai Central Bus Depot: मुंबईत उष्णतेची लाट आली असून उन्हाळ्याची सुरूवात झाली आहे. त्यात मुंबई सेंट्रलच्या एसटी स्थानकातील नाथजलचं अधिकृत स्टॉल बंद झाल्यामुळे प्रवाशांना स्वस्त व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नाथजलाच्या विक्रीचे आदेश
एसटी महामंडळाच्या प्रवाशांना परवडणाऱ्या दरात पाणी मिळावे, यासाठी महामंडळाने नोव्हेंबर २०२०मध्ये ‘नाथजल’ सुरू केले. भारतीय रेल्वेच्या ‘रेलनीर’च्या धर्तीवर असलेल्या ‘नाथजला’साठी शेळके बेव्हरेजेसची नियुक्ती केली आहे. एसटी स्थानके-आगारात ‘नाथजला’ची विक्री करण्याचे धोरणात्मक आदेश आहेत.
Iran Israel War : उन्हाळ्याच्या सुट्टीत परदेशी सहलींना ब्रेक, कुटुंबांचं नियोजन फसलं, आखाती देशातील युद्धाचा खिशाला फटका
मुंबई सेंट्रलच्या प्रवेशद्वारावरच ‘नाथजला’च्या अधिकृत स्टॉलसाठी मोफत जागा महामंडळाने दिली होती. स्टॉलमध्ये केवळ ‘नाथजला’ची विक्री होत असे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा स्टॉल बंद आहे. एसटी स्थानकात प्रवाशांनी पाण्याची मागणी केली असता, विक्रेत्यांकडून ‘नाथजला’ऐवजी अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी प्रवाशांच्या हाती सोपवून २० रुपये वसूल करण्यात येतात.
पाण्याच्या मागणीत वाढ
‘नाथजला’चे अर्धा लिटर पाणी नऊ रुपये आणि एक लिटर पाण्याची बाटली १५ रुपयांना मिळते. अन्य कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात. ‘उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढत आहे. आधीच मोफत पाणपोईची दुरवस्था झालेली असताना, ‘नाथजल’देखील मिळत नसल्याने प्रवाशांच्या घशाला कोरड पडली आहे. ‘नाथजल’ योजना बंद झाल्यास महामंडळाने त्याबाबत अधिकृत घोषणा करावी, ‘नाथजला’मुळे प्रवासी आणि विक्रेते यांच्यात शाब्दिक वादावादीचे प्रकार घडत आहेत,’ असे प्रवासी वैभव बर्वे यांनी सांगितले.
Maharashtra Weather 10th March: उन्हाचा तडाखा वाढणार! मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
‘नाथजला’बाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्याशी फोन आणि संदेशाच्या माध्यमातून संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास असमर्थता दर्शवली.
राज्यभरात अपुरा पुरवठा
एसटी महामंडळाच्या ताफ्यात वातानुकूलित बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. बहुतांश प्रवासी साध्या बसगाड्यांतूनच प्रवास करतात. उन्हाच्या तडाख्यामुळे प्रवासात प्रचंड झळा बसत असल्याने तहान अधिक लागते. राज्यातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर अशी महत्त्वाची एसटी स्थानके वगळल्यास सगळीकडे ‘नाथजला’चा प्रचंड तुटवडा आहे. उन्हाळा लक्षात घेऊन ‘नाथजला’चा पुरवठा वाढवणे गरजेचे होते, मात्र प्रत्यक्षात ‘नाथजल’ मिळणेही कठीण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
