• Mon. Nov 25th, 2024

    हे विघ्न कधी टळणार; खड्डे, विजेचे खांब आणि स्वच्छतागृहांची अव्यवस्था, गणेशभक्तांची मोठी गैरसोय

    हे विघ्न कधी टळणार; खड्डे, विजेचे खांब आणि स्वच्छतागृहांची अव्यवस्था, गणेशभक्तांची मोठी गैरसोय

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवाआधी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवतानाच असमतोल रस्ते समतोल करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड सुरू होती. आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्याची कामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश महापालिकेने संबंधित विभागाला दिलेले होते. मात्र काही विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजलेले नाहीत. यात मालाड, अंधेरी साकीनाका येथे खड्ड्यांबरोबरच मार्गावर विद्युत व्यवस्था नसणे, ई-टॉयलेट नसणे आदींचा सामना गणेशभक्तांना करावा लागणार आहे.

    खड्ड्यांवरूनही मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकांसह अन्य महापालिकांवर ताशेरे ओढले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मनुष्यबळाच्या संख्येत वाढ केली आहे. पूर्वीच्या ७५ अभियंत्यासह प्रत्येक प्रभागनिहाय अभियंता अशा एकूण २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक महापालिकेने केली आहे. मात्र खराब रस्त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचा फटका गणेशोत्सव मंडळांना विसर्जनावेळी बसण्याची शक्यता आहे.

    खड्डे भरण्यात यावेत यासाठी ‘फाईट फॉर राईट’ फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी मनपा पी उत्तर विभागास समाजमाध्यम ‘एक्स’द्वारे तक्रार केली. गणपती आगमनाआधी हे खड्डे भरले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु आगमन झाले तरी खड्डे भरायला मुहूर्त सापडत नाही. आता तरी महापालिका अधिकारी जागे होऊन खड्डे भरतील, अशी गणरायाकडे प्रार्थना करूया, असे घोलप यांनी म्हटले आहे.

    पवई तलाव आणि लोकमान्य टिळक श्यामनगर विसर्जन तलाव येथे जाण्यासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडचा वापर करावा लागतो. मात्र या विसर्जनस्थळी जाताना मेट्रो कामासाठी विजेचे खांब काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे या मार्गावर अंधार होत असून काम पूर्ण झाल्याशिवाय विजेचे खांब बसवणे अशक्य आहे. तसेच पवईकडे जातानाही खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यासंदर्भात मुंबई महापालिका वॉर्डशी संपर्क साधून मेट्रो प्रशासनाशी बोलणे आणि यावर लवकरच तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यावर अद्याप विचार झालेला नसल्याचे जोगेश्वरीत राहणारे आणि बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे सहकार्यवाह शिवाजी खैरनार यांनी सांगितले.

    महिलांची गैरसोय

    जोगेश्वरी हायवेपासून गांधीनगर परिसर असून येथून श्यामनगर तलावापर्यंत जाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचे अंतर आहे. या पट्ट्यात पुरुष आणि महिलासाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे तलावापर्यंत जाता-येताना विशेषकरून महिलाभक्तांचे हाल होतात. स्वच्छतागृह असावे, अशी मागणी आम्ही पालिकेच्या संबंधित विभागाकडे केल्याचे गोरेगावला राहणारे आणि बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे सभासद ऋषी पालकर यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed