दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी आज पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेय घेतली. यानंतर त्यांना पत्रकारांनी पत्रकार परिषद पुढे का ढकलली? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी आज अजित पवार यांच्यासोबत विमान अपघातात निधन झालेल्या पिंकी माळी हिच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जय पवार यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “मी पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेईन. त्या पत्रकार परिषदेत मला जी काही माहिती मिळाली आहे त्याबद्दल सर्व माहिती देईन”, असं जय पवार यांनी सांगितलं. “पिंकी माळी यांच्या आईशी आम्ही बोललो. मुलगा किंवा मुलीचं आपल्या आई-वडिलांशी जवळचं नातं असतं. मी सुद्धा एक मुलगा आहे. हे दु:ख सहजासहज मनातून जाणार नाही. आता आम्हीच कुटुंब म्हणून एकमेकाची काळजी घेणार. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोललो. पिंकी माळी यांच्या आई आज घरी आल्या आहेत. पण त्यांची तब्येत अजून बरी नाहीय. त्यामुळे मी एका डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांना उद्या ज्यूपीटर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतील. तशी त्यांची प्रकृतीची तपासणी केली जाईल आणि काळजी घेतली जाईल”, अशी माहिती जय पवार यांनी दिली.
‘माझ्यावर कुणाचा दबाव नाही’, जय पवार यांचं वक्तव्य
तुमची सोमवारी पत्रकार परिषद होणार होती. पण ती तुम्ही पुढे ढकलली. तुमच्यावर दबाव आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी जय पवार यांना विचारला. त्यावर त्यांनी, “माझ्यावर कुणाचाच दबाव नाही. आज जसं मी पिंकी माळींच्या कुटुंबाला भेटायला आलो आहे. मलाही स्वत:ला अजून काही माहिती पाहिजे. कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसत्या काही गोष्टी बोलून फायदा नाही. खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर त्या आल्या पाहिजेत. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक याबाबत निर्णय घेतला. आमच्यावर दबाव कुणाचाच नाही. आम्ही अजित दादांच्या विचारांचे आहोत. अजित दादांनी सुद्धा तसंच केलं असतं. पूर्ण माहिती घेऊन पत्रकार परिषद घेतली असती”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया जय पवार यांनी दिली.
रोहित पवार यांच्याबद्दल जय पवार काय म्हणाले?
“रोहित पवार यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. सगळ्यांचा अधिकार असतो. रोहित दादांच्या मनात जे आहे, ते शक्य तशी माहिती काढत आहेत. सर्वच कार्यकर्ते आणि नागरिकांना नेमकं काय झालं आहे याची माहिती पाहिजे आहे. मला माहिती आहे की, अजित दादा असते तर त्यांनी सगळ्याच तपास यंत्रणांवर विश्वास ठेवला असता, जसा त्यांनी आधीच्या काळात विश्वास ठेवला आहे. आता पुढे जेव्हा नवीन अहवाल येईल त्यातून आपल्याला जी माहिती मिळेल त्यातून आपण बघू”, अशी प्रतिक्रिया जय पवार यांनी दिली.
‘तपास यंत्रणा माहिती देत नाही तोपर्यंत…’
“जोपर्यंत तपास यंत्रणा आपल्याला सगली कायदेशीर माहिती देत नाहीत तोपर्यंत मी या सगळ्याबद्दल काहीत बोलू शकत नाही. कारण आपल्याला ब्लॅक बॉक्समध्ये काय झालंय ते माहिती पाहिजे. फ्लाईट डेटा रेकॉर्डमध्ये काय माहिती मिळाली ते माहिती पाहिजे. अजून काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या समोर आलेल्या नाहीत. जेव्हा त्या समोर येतील आपल्या सगळ्यांना माहिती मिळेल. माझी पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद आहे त्यामध्ये मी माझे विचार मांडेन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा