Middle East Crisis: मध्य पूर्व आशियात युद्ध सुरु असल्यानं जगभरात होणारी तेल वाहतूक बाधित झाली आहे. याचा फटका जगातील सर्वच देशांना बसला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणं अतिशय जिकरीचं बनलं आहे. युद्धाच्या धामधुमीत एक तेल टँकर मुंबईत दाखल झाला आहे.
अनेक देशाच्या तेल टँकर्सना होर्मुझची सामुद्रधुनी पार करणं अवघड जात असताना भारताच्या पदरात पहिलं यश पडलं आहे. भारताचा एक तेल टँकर सुरक्षितपणे मुंबईत पोहोचला आहे. याबद्दलची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टनं दिली. ‘होर्मुझ सुरक्षित पार करणं अतिशय अवघड होतं. पण भारतीय कॅप्टननं समयसूचकता दाखवली आणि टँकरनं सुरक्षितपणे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली’, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टनं दिली.
टँकरनं होर्मुझची सामुद्रधुनी कशी ओलांडली?
होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडताना जहाजानं काही वेळासाठी ट्रॅकिंग सिस्टिम बंद केला आणि ‘डार्क मोड’मध्ये एंट्री घेतली. लायबेरियाचा झेंडा असलेला ‘शेनलोंग सुएजमॅक्स’ टँकर सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरातून खनिज तेलाचा साठा घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टला पोहोचला. या टँकरमध्ये १,३५,३३५ मेट्रिक टन खनिज तेल होतं. टँकर रिकामा करायची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर त्यातील खनिज तेल मुंबईतील तेल शुद्धीकरण केंद्रांवर जाईल.
टँकर ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म्सनुसार, शेनलोंग सुएजमॅक्सनं शेवटचा सिग्नल ९ मार्चला होर्मुझ सामुद्रधुनीत नोंदवला गेला होता. यानंतर जहाजानं सामुद्रधुनीतून जाताना काही वेळासाठी ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम (एआयएस) बंद ठेवली. यानंतर एका दिवसानंतर हे जहाज पुन्हा एकदा ट्रॅकिंग सिस्टिमवर दिसू लागलं. एआयएस बंद ठेवल्यानं जहाज ‘अदृश्य’ झालं. बुधवारी हे जहाज मुंबईत दाखल झालं.
ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम म्हणजे काय?
ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम अर्थात एआयएस जहाजांवरील एक यंत्रणा असते. यामुळे जहाजाची ओळख, ठावठिकाणी, त्याच्या मार्गाची माहिती अन्य जहाजांकडे आणि किनाऱ्यावरील यंत्रणांकडे आपोआप पोहोचते. सागरी प्रवास सुरक्षित करणं हा यामागचा प्रमुख हेतू आहे. जहाजांचे अपघात टाळणं, सागरी टेहळणीसाठी याचा वापर होतो. एखाद्या जहाजानं ही यंत्रणा बंद केल्यास त्याचा ठावठिकाणा शोधणं जवळपास अशक्य होऊन जातं. सगळ्या व्यावसायिक जहाजांना ही यंत्रणा सुरु ठेवणं अनिवार्य असतं.
