• Sat. Sep 21st, 2024
कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट प्रवेश नको, पुण्यात सरकारीसह खाजगी कार्यालयांनाही RTO चा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘शहर आणि जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांसह खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट प्रवेश देऊ नका, अन्यथा संबंधित प्रशासनावरच कारवाई केली जाईल,’ असा इशारा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिला आहे. शहरी भागासह जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी अशा १७७७ आस्थापनांना ‘आरटीओ’ने नोटीस बजावली आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांना आता हेल्मेटच्या नियमांची अंलबजावणी करणे अनिवार्य असणार आहे.

आरटीओने पुणे शहर व जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांतील अपघातांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये ८० टक्के अपघात दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे असल्याचे दिसून आले. तर, दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातल्याने प्राणांतिक अपघात झाल्याचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर, ‘आरटीओ’ने हा निर्णय घेतला आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाने हेल्मेट घालणे गरजेचे आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक सरकारी व खासगी आस्थापनांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यासंदर्भात प्रबोधन करण्यास ‘आरटीओ’ने सांगितले होते. तसेच, कार्यालयात दुचाकींवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नका, अशा सूचना आरटीओने अनेक वेळा दिल्या होत्या. पण, त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे आरटीओकडून आता कडक पावले उचलण्यात सुरुवात केली आहे.

पुणे आरटीओकडून पुणे शहर व जिल्ह्यातील सरकारी कार्यालय, कर्मचाऱ्यांसी संख्या जास्त असलेल्या कंपन्या, एमआयडीसीतील कंपन्या, वेगवेगळी कॉलेज अशा १७७७ आस्थापनांना हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नका, अशा नोटीसा बजावल्या आहेत. मोटार वाहन कायदा कलम १९४ ड नुसार विना हेल्मेट वाहन चालविणे आणि चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित केली आहे. आपल्या कार्यालयाच्या आतमध्ये त्यांनी विनाहेल्मेट प्रवेश देऊ नये. अन्यथा संबंधित आस्थापनेला जबाबदार धरून त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, अशी नोटीस ‘आरटीओ’ने दिली आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील सरकारी व खासगी आस्थापनांचे धाबे दणाणले आहेत. काही ठिकाणी याची अंमलबजाणी सुरू करण्यात आली आहे.

वाढते अपघात, ओव्हरलोड गाड्या; भर बैठकीत आमदारांकडून अधिकाऱ्याची खरडपट्टी

सीसीटीव्हीतून कारवाई सुरू

सरकारी व खासगी आस्थापनांना हेल्मेट न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्याच्या सूचना ‘आरटीओ’ने दिल्या होत्या. पण, त्यावर आस्थापनांनी काहीही लक्ष न दिल्यामुळे आरटीओने आता थेट आस्थापनांमध्ये जाऊन प्रवेशद्वाराचे सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाईला सुरुवात केली आहे. एखादा कर्मचारी विनाहेल्मेट प्रवेश करताना दिसून आल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत आयटी कंपन्या, एमआयडीसीतील कंपन्यामध्ये जाऊन ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये १०४ कर्मचाऱ्यांवर करावाई करण्यात आली आहे.

खासगी व सरकारी आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयात दुचाकीवरील कर्मचाऱ्यांना हेल्मेट शिवाय प्रवेश देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. या सूचनेचे पालन न करणाऱ्यांवर व संबंधित आस्थापनावर मोटार वाहन कायदा कलम १९४ ड नुसार कारवाई केली जाईल.

– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

७० ते ८० टक्के

एकूण अपघातामध्ये दुचाकी चालक व पादचाऱ्यांचे प्रमाण

१७७७

पुणे शहर व जिल्ह्यातील अस्थापनांना नोटीस

१०४

दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई

Pune News : पुणे जिल्ह्यात भीषण अपघात: तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed