उद्धव ठाकरे यांनी आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठल्या विधानसभा मतदार संघात आपल्या पक्षाची किती ताकद आहे ? याचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बैठकीला उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं.
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काही जागांमध्ये पक्षाला तडजोड करावी लागेल त्याची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ प्रमुख त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून संघटनात्मक ताकद वाढवा, अशा सूचना देखील ठाकरे यांनी केल्या आहेत.
मविआ म्हणून लढण्याकडे ठाकरेंचा कल
उद्धव ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आढावा घेत असताना महाविकास आघाडीसंदर्भात वक्तव्य केलं. मविआ म्हणून लढत असताना काही जागांवर तडजोड करावी लागणार आहे, त्याची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याकडे उद्धव ठाकरेंचा कल असल्याचं दिसून येत आहे.
अहमदनगरमध्ये विजय मिळवायचाय
अहमदनगर लोकसभा आपल्याला जिंकायचीच आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत व्यक्त केला. सुजय विखे पाटलांचा पराभव आपल्याला करायचा आहे, तयारीला लागा, असं ठाकरे म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा जागा लढायच्या याबाबत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे आणि त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केल्या.