याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर हा परिसरात उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. येथे तिघांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी अवघ्या काही तासात त्यांना आटक केली.
या तिघांनी दारुच्या नशेत दगड आणि सिमेंटच्या दगडाने पिंपळे सौदागर येथील वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ज्या ठिकाणी त्यांनी ही तोडफोड केली होती. त्याच ठिकाणी त्यांना नेऊन त्यांची सर्व नागरिकांसमोर धिंड काढली.
सर्वसामान्यांमध्ये अशा गुंडांची दहशत कमी व्हावी, या उद्देशाने पोलिसांकडून अशा गुंडांच्या धिंड काढल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वाहने तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे याला वचक बसावा म्हणून पोलिसांनी पावले उचलली असून गुंडांना अद्दल घडवली जात आहे.
अशा गुंडांची धिंड काढल्याने सर्वसामान्य नागरिकांत त्यांचा वचक कमी होऊन सर्व सामान्य नागरिक दहशतीखाली राहणार नाही, हा या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.