• Sun. Jun 7th, 2026
    LPG Shortage : युद्धाचा भडका, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती?

    नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्षाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. नागपूरसह राज्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल, धाबे आणि खाद्यपदार्थ व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅस एजन्सीकडून पुरेशा प्रमाणात सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांना आता पर्यायी व्यवस्थेकडे वळण्याची वेळ आली आहे.

    मागील काही दिवसांपासून व्यावसायिकांना मिळणाऱ्या गॅस सिलेंडरच्या संख्येत मोठी घट झाली आहे. व्यवसायिकांच्या माहितीनुसार, यापूर्वी दररोज सुमारे दहा व्यावसायिक सिलेंडर मिळत होते. मात्र सध्या ही संख्या अचानक घटून केवळ दोन ते तीन सिलेंडरवर आली आहे. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारा गॅस अपुरा पडत आहे. त्यामुळे हॉटेल आणि धाबा चालकांना कामकाज सांभाळणे कठीण होत आहे.

    अनेक हॉटेल मालकांनी याबाबत गॅस एजन्सीकडे विचारणा केली असता, सध्या स्टॉक मर्यादित असल्याने कमी प्रमाणात सिलेंडर दिले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच सिलेंडरची संख्या वाढवता येईल, असेही एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    नागपूर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहक हॉटेल आणि धाब्यांमध्ये जेवणासाठी येतात. मात्र गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे स्वयंपाकाची प्रक्रिया मंदावली आहे. कमी सिलेंडरमध्ये जास्त ग्राहकांना सेवा देणे कठीण होत असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर काही हॉटेल आणि धाबा चालकांनी पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहेत. गॅस सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत तर लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची तयारी करण्यात आली आहे. काही ठिकाणी लाकडाचा साठाही करून ठेवण्यात आला आहे. याशिवाय इलेक्ट्रिक स्टोव्ह, इंडक्शन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने स्वयंपाक करण्याचाही विचार केला जात आहे.

    हॉटेल चालकाने सांगितले की, गॅस मिळाला तर उत्तमच; मात्र पुरवठा थांबला तर ग्राहकांना सेवा देणे थांबवता येणार नाही. त्यामुळे आम्ही आधीच लाकूड आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा पर्याय तयार ठेवला आहे. गॅसचा पुरवठा दीर्घकाळ नियमित झाला नाही तर त्याचा आर्थिक परिणामही होऊ शकतो. लाकूड किंवा इलेक्ट्रिक साधनांवर स्वयंपाक करणे अधिक वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या दरांवरही होऊ शकतो.

    दरम्यान, गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा हॉटेल आणि धाबा चालकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा नागपूरातील अनेक लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    नाशिक शहरात देखील कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा, अनेक हॉटेलमध्ये २ दिवसांचा गॅस साठा शिल्लक

    नाशिकमध्ये सुद्धा हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. सध्या परिस्थितीला नाशिकच्या एका हॉटेलमध्ये दिवसाला दोन ते तीन गॅस सिलेंडर लागतात. मात्र कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा होऊ शकत नसल्याने केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतका साठा आता शिल्लक राहिला आहे. त्यानंतर हा साठा उपलब्ध होने कठीण झाल्याने, हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आता हॉटेल व्यवसायिकांवर आलेली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या संपूर्ण विषयावर आता सरकार आणि प्रशासन काय तोडगा काढते? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

    “गेल्या शनिवार-रविवार पासून गॅस सिलेंडर तुटवड्याची समस्या निर्माण झाली आहे. गॅस सिलेंडर पुरवठाबाबत आम्ही विक्रेता यांच्याशी संपर्क साधत आहे. परंतु कमर्शियल गॅस सिलेंडर द्यायचा नाही, असे उत्तर दिले जात आहे. परिणामी आम्ही हॉटेल मेन्यू हा संकुचित केला आहे”, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिक रितेश पाटील यांनी दिली.

    छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांचाच औद्योगिक गॅसचा साठा

    आखातातील युद्ध परिस्थितीमुळे औद्योगिक नगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन दिवस पुरेल एवढाचा औद्योगिक गॅसचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यामुळे वाहन उद्योगातील काही उद्योग बंद पडले आहेत. हे संकट करोनापेक्षाही भयानक असू शकेल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. पुढील दोन दिवसांत एलएनजी, एलपीजी, मिथेनॉल आणि पिचिंग ऑईल याचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर वाहन उद्योगासह औषधी निर्मिती उद्योग बंद पडण्याची भीती आहे.

    छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना सर्वसाधारणपणे २४० मेट्रिक टन गॅस पुरवठा लागतो. आखातातील युद्ध परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर आता परिणाम जाणवू लागला आहे. सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांतील दहा कंपन्यांचे काम मंगळवारी थांबल्याचे सूत्रांनी सांगितले. जर गॅसपुरवठा सुरळीत झाला नाही तर कंपन्या त्यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांच्या जीवनावर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात आहे.

    परिस्थितीवर चाचपणी करण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. बैठकीत अनेक उद्योजकांनी दोन दिवसांचा इंधनसाठा शिल्लक असल्याचे सांगितले. ऑरिक ग्रीन कंपनीचे गोसर यांनी सांगितले, की आम्हाला रोज ३२ ते ३५ मेट्रिक टन गॅस लागतो. तो आता मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे. पुढचे चार-पाच दिवस कामकाज कसेबसे चालेल. त्यानंतर कंपनी बंद केल्याशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे २५० कंत्राटी काम करतात. त्यांचीही अडचण होणार आहे.

    “छत्रपती संभाजीनगरमध्ये छोटे मोठे साडेचार हजार उद्योग आहेत. त्यातील ९० टक्क्यांहून अधिक उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. दोन,तीन दिवस पुरेल एवढाच इंधनसाठा असल्याने उद्योगांसमोर संकट आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर मोठे नुकसान होईल”, अशी प्रतिक्रिया सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माच्छर यांनी दिली.

    कोल्हापूरात गॅस सिलेंडरसाठी रांगा; मात्र घाबरुन न जाण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

    सध्या गॅस सिलेंडर बुकिंग कालावधी 21 वरून आता 25 दिवसांवर करण्यात आला आहे. त्यातच गॅस सिलिंडरची किंमतही 60 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या काळात गॅस मिळेल की नाही? याबाबत संभ्रमावस्था असल्यामुळेच गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या कोल्हापुरात ठिकठिकाणी रांगा लागल्या आहेत. काही जणांचे गॅस सिलिंडरसाठी बुकिंग झाले आहे. त्यामुळे रांगा लावून सिलिंडर घेत आहेत. यावेळी काही ठिकाणी वितरकांशी वादाचे प्रसंग देखील उद्भवत आहेत. मात्र यावर बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे. “जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गरज असल्यासच गॅस सिलिंडर बुकिंग करावे. व्यावसायिक गॅसवर तात्पुरते निर्बंध आणले आहेत”, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली.

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed