मुलींना चांगले शालेय शिक्षण मिळावे आणि उज्ज्वल भविष्यासाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मुलीच्या भवितव्यासाठी चक्रवाढ पद्धतीने व्याजाने चांगला परतावा मिळतो.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुलीच्या जन्मासोबत तिच्या भविष्यासाठी प्रत्येक पालक विविध योजना आखतात. चांगले शिक्षण, चांगले आयुष्य याबरोबरच तिच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे असते. यासाठीच केंद्र शासनाने ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू केली. मुलींच्या भविष्यासाठी बचत निर्माण करण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेअंतर्गत ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू करण्यात आली असून ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या आर्थिक सुरक्षितता आणि सक्षमीकरणाला प्राधान्य देणे असा आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत अनेक कर लाभांसह आयकर परतावा सुद्धा आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 कोटीहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. तर 3 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे.
250 रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत एका वर्षात यामध्ये गुंतवणूक करता येते. पोस्ट किंवा बँक मध्ये खाते उघडल्यानंतर 15 वर्षे रक्कम जमा करावी लागते, तर खाते 21 वर्षांनंतर परिपक्व (Mature) होते. विशेष म्हणजे या योजनेवर आकर्षक व्याजदर दिला जातो आणि व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने केली जाते. त्यामुळे दीर्घकालीन बचतीवर चांगला परतावा मिळतो.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक वर्षा फडके-आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुकन्या समृद्धी योजने’चा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे करसवलत. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलत मिळते. तसेच या खात्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कमही करमुक्त असते. त्यामुळे ही योजना सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय ठरते.
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते. तसेच मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते. त्यामुळे शिक्षण किंवा लग्नासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर ही योजनामोठा आर्थिक आधार ठरते.
या योजनेचे उद्दिष्टे :
मुलींच्या शिक्षणाला चालना देणे.
मुलींना चांगले शालेय शिक्षण मिळावे.
मुलींच्या कल्याणासाठी आणि शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणे.
या योजनेचा लाभ कसा घेता येईल?
पालक आपल्या मुलींसाठी पोस्ट किंवा बँकेत खाते सुरू करू शकतात.
एका मुलीसाठी एकच खाते उघडता येईल.
मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असावे.
एका कुटुंबाला जास्तीत जास्त दोन खाती उघडता येतात.
आवश्यक कागदपत्रे :
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
पालकांचा फोटो / ओळखपत्र
पालकांचा पत्ता पुरावा
पॅन / आधार / केवायसी कागदपत्रे
आजच्या काळात मुलींच्या शिक्षणालाआणि स्वावलंबनाला विशेष महत्त्व दिले जात आहे. ‘सुकन्या समृद्धी योजना’ ही केवळ बचतीची योजना नसून मुलींच्या सक्षमीकरणाचा एक प्रभावी मार्ग आहे. पालकांनी लहानपणापासूनच या योजनेत बचत सुरू केल्यास भविष्यात मुलीच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा