या प्रकरणी पोलिस अंमलदार उत्तम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उत्तम जाधव हे शनिवारी सिडको ठाण्यातील ११२ नंबर गाडीवर कर्तव्य बजावित होते. एम्स हॉस्पिटलमध्ये एक जण डॉक्टरला मारहाण करीत असल्याचा फोन आला. त्यानुसार अंमलदार जाधव यांच्यासह अतुल सोळंके घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी आरोपीने त्याची कार रस्त्यावर लावली होती. पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्याची सूचना केली. त्या वेळी शिवानंद तेथे पट्टा घेऊन उभा होता आणि मी गाडी बाजूला घेणार नाही, असे सांगून त्याने पोलिसांना धमकावले. तसेच, हॉस्पिटल जाळून टाकणार, अशी धमकीही त्याने ओरडून दिली.
दोन पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांना शिविगाळ सुरू केली. तसेच, जाधव यांच्या गणवेशाची कॉलर पकडून बेल्टने मारहाण सुरू केली. शिवानंदचे आई-वडील गजानन व विजया या दोघांनी कर्मचाऱ्यास पकडले. त्यानंतर तोंडावर, डोळ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. दुसरे कर्मचारी सोळंके यांनाही त्यांनी मारहाण केली. काही नागरिकांनी पोलिसांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी पोलिसांना मारहाण करणाऱ्या शिवानंद मोरेसह अन्य दोघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी
सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींनी अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कैलास अन्नलदास करीत आहेत.