सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्याने आपलाच अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. दुसकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची घट्ट मैत्री झाली आहे. त्यांचे निवडून आलेले सदस्य दगाफटका होऊ नये म्हणून सहलीला गेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचे काउंटडाउन सुरू झाले असताना राष्ट्रवादीच्या सदस्यांचा म्हैसूरमधील प्रसिद्ध वृंदावन गार्डन आणि पंचतारांकित हॉटेल रॉयल ऑर्किडसमोरील एक फोटो नुकताच समोर आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे झेडपी सदस्य दक्षिण भारतातील कर्नाटक आणि केरळमध्ये ट्रीप एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड 20 मार्च रोजी होणार आहे. कमळ चिन्हावर निवडून आलेले भाजपचे 27 आणि एका अपक्षाच्या पाठिंब्यासह सर्वाधिक 28 सदस्य असल्याने अध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका भाजप नेते जयकुमार गोरे यांनी घेतली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस 20, शिवसेना 15, काँग्रेस 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, अशा 37 सदस्यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
भाजपकडून घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा संभाव्य धोका ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या सदस्यांना ‘सेफ स्टेट’ म्हणून दक्षिण भारतातील काँग्रेस शासित कर्नाटक, केरळच्या सहलीवर पाठवले आहे. सदस्यांची संपूर्ण बडदास्त ठेवण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांनी आपल्या खास शिलेदारांवर सोपवली आहे. म्हैसूर, उटीमध्ये राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य पर्यटनाचा आनंद लुटतानाचे एक छायाचित्र देखील समोर आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला 10 दिवस उरले आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अध्यक्ष निवडीत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आपापल्या सदस्यांना व्हीप काढला जाईल. पण मतदान गुप्त पद्धतीने होणार की हात वर करून होणार? हे देखील महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपुर्वी 16 मार्चला जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती निवडी होणार असून काही पंचायत समितींमध्ये राजकीय उलथापालथी पाहायला मिळतील.
