रायगड जिल्हापरिषदेमध्ये 11 मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. तर 12 मार्चला सभापतींपदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान सर्वात मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटावर विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2019 विधानसभा निवडणुकीचा दाखला
राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, जरी शिंदे गटाचे सदस्य संख्यात्मक दृष्ट्या सर्वाधिक असले तरी, पक्षांमधील युती, सामंजस्य आणि धोरणात्मक निर्णय यामुळे सत्तेवर त्यांचा पूर्ण प्रभाव राहणार नाही. 2019 च्या विधान सभा निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपचे सर्वाधिक 105 आमदार निवडून आले होते, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामुळे महाआघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाले होते. त्या वेळी सर्वाधिक आमदार असलेला पक्ष विरोधी बाकावर बसला होता, असा अनुभव रायगडमध्ये शिंदे गटाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बड्या नेत्यांची उपस्थिती
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रमुख नेते रायगडमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री नितेश राणे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, आमदार रविशेठ पाटील तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
विजयी मिरवणूक
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक अलिबाग शहरातून काढण्यात येणार असून, त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता अलिबाग समुद्र किनारी भाजप-राष्ट्रवादी युतीची विजयी सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू असून कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.
