प्रदीप राजमाने पुढे म्हणाले की, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात पुढचे पाच दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ ते १ ऑगस्ट पर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज आणि उद्यासह ३० आणि ३१ जुलै आणि १ ऑगस्टला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं प्रदीप राजमाने म्हणाले. २९ ते १ तारखेदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात कशी स्थिती असेल?
पुण्यात पुढील चार दिवसात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. तर, पुण्यातील घाट विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.
चासकमान धरण ९३ टक्के भरलं
भिमाशंकर अभयारण्य घाटमाथ्यावर गेले दोन आठवडे वरुणराजा सक्रीय झाल्याने चासकमान धरण ९३ टक्के भरल्याने दि. २८ जुलैला सायंकाळी ५ वाजता धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले.३८५० क्युसेसने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून पश्चिम भागात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने भीमानदीत पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्कता बाळगावी तसेच नदीवरच्या पुलासह कोल्हापुरी बंधाऱ्याचा वापर शक्यतो टाळण्याचे आवाहन प्रांत जोगेंद्र कट्यारे , तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले आहे.