जयंत पाटील यांनी सोमवारी संध्याकाळी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नेमके काय घडले, याचा तपशील सांगितला. मी आणि विश्वजित कदम राज्यपालांना भेटून माझ्या घरी पोहोचलो होतो. त्यावेळी मला शरद पवार यांचा फोन आला. तुम्ही ताबडतोब यशवंतराव चव्हाण सेंटरला या, असे त्यांनी सांगितले. याठिकाणी आमदार भेटायला आले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावर मी शरद पवारांना म्हणालो की, मला तिकडे यायला वेळ लागेल, तुम्ही आमदारांना भेटून घ्या, असे मी त्यांना सांगितले. मात्र, पवारसाहेब म्हणाले की, तुम्ही आल्याशिवाय मी कोणालाही भेटणार नाही. त्यामुळे मी तिकडे जाईपर्यंत हे सर्व आमदार तिकडे बसून होते. मी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर माझ्यासमोर या सगळ्या आमदारांशी बोलणं झालं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील आजच्या बैठकीत काय घडले, याबद्दलही माहिती दिली. अजित पवार, प्रफुल पटेल आणि काही आमदार शरद पवार यांना भेटले. त्यांनी पदस्पर्श करुन पवार साहेबांचे दर्शन घेतले. काल अजित पवारांसोबतच्या मंत्र्यांनी जी विनंती केली होती, तीच विनंती या आमदारांनी केली. गेली अनेक वर्षे ज्या लोकांनी शरद पवारांच्या नेतृत्त्वात काम केले आहे, तेच लोक पुन्हा शरद पवार यांना भेटत असतील तर त्यामध्ये काही चूक नाही. यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीत अनेक वर्षे काम केले त्या सर्वजणांचे कुटुंब आहे. त्यामधील काही लोकांनी वेगळी कृती केली आहे. पण तेच लोक आज शरद पवार यांना येऊन भेटले, मार्ग काढा यातून काहीतरी, अशी विनंती केली. याबद्दल कोणीही अस्वस्थ होण्याचे कारण नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. ते येऊन भेटतायत, प्रत्येकवेळी पवार साहेबांनी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणाऱ्या सगळ्यांनाच पवार साहेब भेटतात. राजकारणात कधीही संवाद बंद करायचा नसतो. ते परत आले तरी शरद पवार त्यांच्याशी बोलतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले.