मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला ठाण्यातून सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ४५पेक्षा जास्त जागा आपण जिंकू शकतो. तसेच विधानसभेच्या निवडणुकाही आपण महायुती म्हणून लढवणार आहोत. २०० पेक्षा जास्त आमदार जिंकून येतील’, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्यात मुंबईचे माजी नगरसेवक सुनील मोरे, सुप्रिया मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
‘कलंक तुम्हीच’
‘देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हणता, मात्र २०१९मध्ये महायुतीला बहुमत असताना महाविकास आघाडीत जाऊन खरे महाकलंक लावण्याचे काम तुम्ही केले’, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
‘सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार तुडवले’
‘ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही तुम्हाला जिल्ह्यात एकनाथ शिंदे म्हणून काम करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले. अडीच वर्षांपूर्वी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवल्याचा आरोपही त्यांनी केला. पण सत्तेची हवा डोक्यात गेली की काय होते हे आता समजले असेल, असाही टोला शिंदे यांनी लगावला.
५० पैकी एकाचाही पराभव होऊ देणार नाही: एकनाथ शिंदे
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण महायुती म्हणून लढविणार आहोत. आपल्याबरोबर आलेल्या ५० पैकी एकाही आमदाराचा विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.