• Sat. Sep 21st, 2024
पोलीस अधीक्षक कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलची लाचखोरी, कारण ऐकून डोक्यावर हात माराल

कोल्हापूर : पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षातील महिला कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. कौटुंबिक वादाच्या तक्रार अर्जानंतर समुपदेशन करुन वाद मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलीस रंगेहाथ सापडली.

काजल गणेश लोंढे (वय २८ वर्ष, रा. पसरिचा नगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) असे अटकेतील लाचखोर महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात ही कारवाई झाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महिन्यापूर्वी पत्नीच्या विरोधातील कौटुंबिक वादाचा अर्ज महिला सहाय्य कक्षात दिला होता. कॉन्स्टेबल काजल लोंढे हिने तक्रारदार पती आणि त्याच्या पत्नीस समोरासमोर बोलवून समुपदेशन केले. यानंतर तंटा मिटून ते दाम्पत्य एकत्रित राहू लागले.

तंटा मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी लोंढे हिने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. लोंढे हिने महिला सहाय्य कक्षात दोन हजारांची लाच स्वीकारताच पथकाने तिला रंगेहाथ पकडले.

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडली सहा कोटींची रोकड, मोजून अधिकारीही दमले!

दरम्यान लाचखोर लोंढे हिच्या घराचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली. मात्र, झडती दरम्यान विशेष काही हाती लागले नाही. काजल लोंढे २०१४ पासून पोलिस दलात कार्यरत आहे. आठ महिन्यांपूर्वीच ती महिला सहाय्य कक्षात रुजू झाली होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्यासह प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, संगीता गावडे, पूनम पाटील यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed