Satara News: व्हिडिओचा आधार घेत आरोपी तरुणाने पाचगणीतील ‘सफायर मून लाईट व्हिला’ व डिसेंबर २०२५ मध्ये साताऱ्यातील एका कॅफेमध्ये नेऊन वारंवार पीडित महिलेवर अत्याचार केले.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील पीडित महिला आणि संशयित आरोपीची जानेवारी २०२३ मध्ये ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर संशयित आरोपी हा पीडितेच्या सतत संपर्कात राहू लागला. पीडित महिलेची घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयिताने तिचा विश्वास संपादन करत तिला लग्नाचे आमिष दाखवले.
दरम्यान, पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये पीडितेने म्हटले आहे की, आपल्या राहत्या घरी जुलै २०२४ पासून मार्च २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी हा गुन्हा घडला आहे. संशयिताने राहत्या घरी जुलै २०२४ मध्ये पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर कास रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार केले. त्यावेळी त्याने गुपचूप व्हिडिओ क्लीप काढली. तो व्हिडिओ दाखवून आपल्याला धमकावले. व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केल्यानंतर संशयिताने आपल्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याच व्हिडिओचा आधार घेत त्याने पाचगणी येथील ‘सफायर मून लाईट व्हिला’ आणि डिसेंबर २०२५ मध्ये सातारा येथील देवी चौकातील एका कॅफेमध्ये नेऊन वारंवार अत्याचार केले.
संशयित आरोपीच्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतरही संशयिताने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. मात्र, पीडितेने धैर्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी प्रतीक वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
