अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातली संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिंदेसेनेतही मोठी अस्वस्थता पसरलीये. अशा सगळ्या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे बोलते झाले नव्हते. आज शिवसैनिकांच्या सत्कारावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फोटोवर हातोडा चालवणाऱ्या अधिकाऱ्याला आपण शिवसेना स्टाईलने दाब विचारला. तुमचं कौतुक कसं करु कारण तुम्ही शिवसेना काय आहे ते दाखवून दिलंत. एक लक्षात घ्या हा योगायोग असेल की काय असेल, त्यांनी त्यादिवशी जे काही कृत्य केलं ते विडियोवरुन सगळ्यांनी बघितलं, त्यानंतर त्यांची उतरती कळा सुरु झाली.
भाजप खेळत असलेली लढाई विकृत आहे. त्यांना शिवसेना का नकोय तर त्यांच्या मनात कमालीचा महाराष्ट्र व्देष ठासून भरलाय. विरोध करणारं त्यांना कुणीच नकोय. त्यातूनच त्यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली आणि आता राष्ट्रवादी फोडली. आता याच्याही पुढे जाऊन त्यांना महाराष्ट्र फोडायचाय, पण आपण हे होऊ देणार नाही. आपण ताकदीने लढू, असं म्हणत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांमध्ये जान भरली.
दादांच्या एन्ट्रीने शिंदे गटातही खदखद
जे मंत्री आहेत, त्यांना निश्चितपणे पुन्हा मंत्रिपद मिळेल, शिवाय ज्यांना हे पद हवे आहे, त्यांनाही प्राधान्य दिले जाईल असे सांगत शिंदे गटाने गुवाहाटीला जाणाऱ्यांची संख्या वाढवली. पण वर्ष उलटले तरी मंत्रीपद मिळत नसल्याने या गटातही खदखद वाढली आहे. प्रहारचे बच्चू कडू यांनी त्याला तोंड फोडले असून आणखी काहीजण त्यांच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे.