लक्ष्मण मलिक हे नवीन पनवेल सेक्टर सहा येथे राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो त्यांनी स्टेटसला ठेवला होता. मात्र सदर फोटो स्टेटसवरून त्यांना धमकी देण्यात आली. या प्रकरणाबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
पनवेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो स्टेटसवर ठेवला होता. त्यामुळे ३० जूनला सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांना मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीने एक मेसेज पाठवला होता. इंग्रजी बाराखडीचा वापर करून हिंदी उच्चार अशा पद्धतीने लिहलेल्या संदेशात ‘वेड्या सिव्हिल कोड बनवणारा हाच आहे, फोटो लवकरात लवकर काढून टाक,’ असे लिहिले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीला नाव विचारले असता त्याने अली भाई म्हणून नाव सांगितले होते.
हा संदेश लक्ष्मण यांनी त्यांचे मित्र दर्शन भारद्वाज आणि राजेश जैन यांना दाखवला. त्याच व्यक्तीने ९:२४ वाजता फोन केला आणि त्यावर मोहन भागवत यांच्याबाबत अर्वाच्च बोलून मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप करत फोटो काढून टाकण्याची धमकी दिली. कोण बोलतंय? असं लक्ष्मण यांनी विचारलं. समोरून त्याने स्वतःचे नाव अली भाई असे सांगितले. याबाबत लक्ष्मण यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अली भाई याच्या विरोधात धमकी देणे, अपमानास्पद बोलणे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.