• Thu. Mar 19th, 2026

    Mumbai Water Metro: मुंबईत ‘जल मेट्रो’ प्रकल्पाला वेग, मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर; तीन टप्प्यांत 340 किमी लांब जलवाहतुकीचे जाळे

    Mumbai Water Metro: मुंबईत ‘जल मेट्रो’ प्रकल्पाला वेग, मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर; तीन टप्प्यांत 340 किमी लांब जलवाहतुकीचे जाळे

    Water Metro Route: मुंबईत जल मेट्रोसाठी काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला. यावेळी जल मेट्रोसाठी शिपयार्ड विकसित करण्याबाबत चर्चा झाली.

    मुंबई: मुंबईमध्ये जल मेट्रो येत्या काही महिन्यांत सुरू करण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे. या प्रकल्पासाठी सविस्तर अहवाल राज्य सरकारसमोर सादर झाला असल्याची माहिती नितेश राणेंनी मंगळवारी दिली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून यावेळी मुंबईतील जलवाहतुकीचे जाळे सुधारण्यावर चर्चा झाली.

    1500 कोटींचा खर्च अपेक्षित

    मुंबईमध्ये सध्या तीन टप्प्यांत जल मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. या बैठकीत मेट्रोसाठी आवश्यक जहाजांसाठी शिपयार्ड बनवण्यासाठी जमीन निश्चित करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत पहिली मेट्रो मुंबईमध्ये धावणार आहे अशी चिन्हं दिसत आहेत. पहिल्या टप्प्यात 1500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जलमेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी(PPP) मॉडेल अंतर्गत राबविण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील प्रवाशांना परवडणारा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे.Maharashtra TimesMumbai Local: गुढी पाडव्यापासून प्रवास सुखकर! पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढणार; विरार-चर्चगेटदरम्यान 16 वाढीव फेऱ्या

    मुंबई जल मेट्रोसाठी सध्या 215 किमी लांब मार्गावर 11 नवीन जलमार्ग उभारण्याचं उद्दिष्ट आहे. या मार्गावर एकूण 24 टर्मिनल प्रस्तावित आहेत. सध्या मुंबईत 125 किमी जलवाहतुकीची जाळे सुरू आहे. या विद्यमान मार्गांचंसुद्धा आधुनिकीकरण यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत एकूण 340 किमी लांब जलवाहतूक सुरू होणार आहे. तसेच, 2031पर्यंत प्रवासी वाहतुकीची संख्या 7.5 कोटी होईल असा अंदाज आहे. त्याचबरोबर, यंदा जलवाहतुकीसाठी 3436 कोटींची तरतूद केली आहे. याअंतर्गत 207 इलेक्ट्रिक/हायब्रीड जहाज विकसित करण्यात येणार आहेत.

    शिपयार्डसाठी प्रस्ताव

    या जलवाहतुकीसाठी नंदगाव, दिघे आणि विजयदुर्ग येथे शिपयार्ड विकसित करण्याचा प्रस्ताव या बैठकीत सादर केला गेला. या सविस्तर अहवालामध्ये सहा ते आठ मार्गांचा प्रस्ताव सादर झाला आहे. यापैकी दोन मार्ग निश्चित करून पहिल्या टप्प्यात या दोन्ही मार्गांवर काम सुरू होणार आहे. सध्या नरिमन पॉइंट-वरळी-वांद्रे-जुहू-वर्सोवा या सागरी मार्गांवर जलवाहतूक विकसित करण्यावर भर देण्याचा सध्या प्रस्ताव आहे.

    Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनच्या कामांमुळे घराला तडे, रात्रभर आवाजामुळे झोपमोड; हैराण नागरिकाची हायकोर्टात धाव

    सध्या गेट वे ऑफ इंडिया जवळ जल मेट्रोसाठी रेडिओ क्लब जेट्टी तयार करण्याचं काम सुरू आहे. या मार्गांवरून जल मेट्रो सुरू होताच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी फक्त 40 मिनिटे लागतील.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा