राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीप होते अनिल पाटील देखील तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत. ते सकाळपासून संपर्कात होते. त्यामुळं आता पक्षाचे वरिष्ठ आमदार जितेंद्र आव्हाड यांना पक्षाकडून प्रतोद म्हणून निवडलं आहे. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं जे घडलंय त्याला शरद पवारांचा पाठिंबा नाही. काही लोक काही काळ गैरसमज करुन घेत राहतील पण काही दिवसांमध्ये सगळं स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील जनता आणि युवक शरद पवारांसोबत राहतील, असं जयंत पाटील म्हणाले.
ईडीच्या कारवायांबद्दल लोक समजून घेतील, याचं तुम्ही विश्लेषण करा, असं जयंत पाटील म्हणाले. कायदेशीर बाबी तपासून घेऊन आम्ही कारवाई करु, असं जयंत पाटील म्हणाले. विरोधी पक्षनेत्याला आमदारांना बोलवण्याचा अधिकार असतो. ज्यांना बोलावलं ते गेले जे गेले नाहीत त्यांना बोलावलं गेलं नाही. अजित पवार यांच्यावर विश्वास होता, त्यामुळं आम्ही याबाबत विचारणा केली नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला आहे त्यात आमदार कुणासोबत आहे तो पक्ष नसतो, असं म्हटलं आहे. आमदार गेले तरी पक्ष जात नाही. आम्ही कायदेशीर गोष्टींचा अभ्यास करु आणि त्याबाबत निर्णय घेऊ, असं जयंत पाटील म्हणाले. अनिल देशमुख हे शिक्षा भोगून आले पण ते शरद पवार यांच्यासोबत आहेत, असं देखील जयंत पाटील म्हणाले.