राष्ट्रवादीचे दोन आमदार अजित पवारांसोबत
राज्यात गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भूकंपानंतर आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाभूकंप घडवून आणला आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटीलही गेले आहेत.
हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आमदार राजेश पाटील अजित पवार यांचे कट्टर मानले जातात. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत माझा वाढदिवस साजरा करू नका, असे ते म्हणाले होते. यानंतर ते सोशल मीडियातही चर्चेत आले होते. तर आमदार हसन मुश्रीफ यांच्यामागे गेल्या काही महिन्यांपासून ईडीचा ससेमिरा लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आपल्यावरील कारवाई टाळावी, यासाठी ते अजित पवार यांच्यासोबत गेल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच कोल्हापुरातील त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कागल शहरात कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. तर सोशल मीडियावर कोल्हापूरचे भावी पालकमंत्री अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. तसेच हसन मुश्रीफ आता भाजपबरोबर सत्तेत असल्याने किरीट सोमय्या यांनाही आता ट्रोल केले जाते आहे. त्यांच्यावरही सोशल मीडियामध्ये मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
ज्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून आम्हाला धोका देऊन गेले ते आता काय करणार?
दरम्यान, या सर्वांवर आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महाराष्ट्राचा राजकारण कोणत्या थराला चालले आहे, हे बघून धक्का बसला आहे. राजकारणात नीतिमत्ता कोठे गेली, असे संजय पवार म्हणाले. तसेच हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणारे किरीट सोमय्या आता काय करणार? कारण ज्यांच्या घरी ईडी, सीबीआय जात आहे त्यांना ते सोबत घेऊन बसत आहेत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली.
हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून जे आम्हाला धोका देऊन गेले ते आता काय करणार? कारण आता ज्या राष्ट्रवादीबद्दल ते बोलत होते, त्यांच्या सोबतच आता ते सत्तेत बसले आहेत, असा सवाल संजय पवार यांनी शिंदे गटाला विचारला आहे. महाराष्ट्राची जनता सर्व काही बघत आहे. पुढील निवडणुकीत नीतिमत्ता पायदळी तुडवलेल्या नेत्यांना महाराष्ट्राची जनता जागा दाखवून देईल, असे संजय पवार म्हणाले.