नांदेड : ‘माझे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे. आमच्यावर कोणी कितीही आरोप केले, तरी आम्ही कामानेच उत्तर देऊ,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे केले.या कार्यक्रमाला व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी २५ मिनिटांच्या भाषणात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर थेट टीका केली नाही. ते म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षात जे काम झाले नाही, ते आम्ही ११ महिन्यांत करून दाखवले आहे. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या व्यथा मला जाणीव आहे. म्हणूनच आमच्या सरकारने एनडीआरएफचे नियम बदलले. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ठ केला आणि दहा हजार कोटी रुपयांचे वाटप केले. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे भरावे लागू नये, म्हणून एक रुपयात पिकविमा योजना आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मान योजनेंतर्गत तशेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळत होते. त्या राज्य सरकारने सहा हजार रुपयांची भर टाकली. आम्ही सर्वसामान्यांचे कामगार, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले. नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. वर्धा-नांदेड, लातूर-नांदेड व बिदर नांदेड या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.’
‘समृद्धी महामार्ग नांदेडपर्यंत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे कामही सुरू आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना करताना ५० टक्के सवलत देण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. केंद्राकडे पाठवलेल्या सर्व योजना मंजूर करून घेण्यात यशस्वी झाल्या आहेत. संपूर्ण विश्वात भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम मोदी यांनी केल्या आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीसांची अनुपस्थिती
नांदेडमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. परंतु त्यांचा अधिकृत दौरा रात्री उशिरापर्यंत आलाच नाही. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे भाजप कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.
पुण्यातील लाचखोर IAS अनिल रामोड प्रकरणी खळबळजनक अपडेट; दानवेंनी समोर आणलं विखेंचं ते पत्र
युवक काँग्रेसचे आंदोलन
सुमारे १० महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड ते निळा रोड या कामाचे तसेच अन्य विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात एकही काम सुरू न झाल्यामुळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, दीपक पाटील, अतुल पेद्देवाड शशिकांत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावर नारळ फोडले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तत्काळ या सर्वांना अटक केली. मुख्यमंत्र्यांच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर या आंदोलकांची सुटका करण्यात आली.