• Sat. Sep 21st, 2024

नाशिकच्या कथित पत्रकाराचा कारनामा; खंडणीसाठी थेट ‘एसीबी’ची धमकी, नंतर घडलं असं…

नाशिकच्या कथित पत्रकाराचा कारनामा; खंडणीसाठी थेट ‘एसीबी’ची धमकी, नंतर घडलं असं…

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून (एनडीसीसी) घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही तुमची तक्रार असल्याने तुमच्या विरोधात बातमी देण्याची बतावणी करून खंडणी उकळण्यात आली आहे. याप्रकरणी कथित पत्रकार संशयित कल्पेश विश्वास लचके (वय २७, रा. मखमलाबाद नाका) याच्याविरोधात पंचवटी पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. साठ हजार रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी लचकेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.अशी आहे घटना

कथित वृक्षप्रेमीने चार दिवसांपूर्वी चक्क नोटरी करून महापालिकेच्या वृक्षतोड ठेकेदाराला खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर आता पंचवटी पोलिसांत कथित पत्रकार लचके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीसीसी बँकेचे माजी संचालक गणपतराव गंगाधर पाटील (वय ६८) यांनी फिर्याद दिली. दरम्यान, गुरुवारी (दि. ८) पाटील यांना लचके याने मोबाइलवरून कॉल केला. ‘भोई नावाच्या व्यक्तीने एनडीसीसी बँकेतून घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार केली आहे. ‘एसीबी’कडेही तक्रार करणार हे. तुमच्या विरोधात बातमी देणार आहे’, असे लचके याने पाटील यांना धमकावले. यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी लचकेच्या स्थानिक वृत्तवाहिनी पोर्टलच्या कार्यालयात बोलावले. तिथे ऐंशी हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती साठ हजार रुपये खंडणी देण्यास पाटील यांना भाग पाडले. त्यानुसार पाटील यांनी सोमवारी (दि. १२) सायंकाळी फिर्याद दिली. सोमवारी रात्री लचके याला अटक करून मंगळवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले.
खंडणीसाठी चक्क कायदेशीर नोटरी; कथित वृक्षप्रेमीच्या प्रतापाने नाशिकमध्ये खळबळ, काय घडलं?
साथीदारांचे काय?

फिर्यादी यांच्याकडून साठ हजार रुपये घेतल्यावर संशयित लचके याने ‘माझे चार सहकारी तुम्हाला फोन करतील. त्यांनाही प्रत्येकी २० हजार रुपये द्या’, अशी बतावणी केली. त्यावर आता हे प्रकरण साठ हजारांतच मिटवा, असे सांगत पाटील यांनीही काढता पाय घेतला. दरम्यान, पाटील यांनी पैसे दिल्यानंतर ‘एसीबी’ कार्यालयात काही तक्रार आहे का, याबाबत चौकशी केली. तेव्हा असा कोणताही प्रकार नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. दरम्यान, कथित पत्रकाराने मागितलेल्या खंडणीबाबत सखोल तपास पंचवटी पोलिसांनी सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed