काँग्रेस पक्षातून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची बातमी समोर आली होती मात्र या बातमीच स्वतः रवींद्र धंगेकर यांनी खंडन केल आहे. ‘ मला पक्षाकडून कोणताही आदेश आलेला नाही. मी आता कुठे आमदार झालोय ही पोट निवडणूक आहे हा काळ छोटा आहे. २०१९ साली मोहन जोशी यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्ष त्यांचाच विचार करेल असं मला वाटतं. कारण यापूर्वी त्यांनी पुण्याच्या दोन लोकसभेच्या निवडणुकी लढवल्या आहेत त्याचा त्यांना अनुभव आहे. त्या निवडणुकात देखील त्यांनी चांगली मत घेतली होती आणि आता तर वारं बदलल आहे. मी अजून आमदार आहे पक्षात छोटा कार्यकर्ता आहे. मोहन दादांच्या वयात जायला मला अजून दहा वर्ष बाकी आहेत,त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक लढायला इच्छुक नाही. नंतर पक्ष कधी संधी देईल तेव्हा मी आहेच.’ असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
मात्र, दुसरीकडे काँग्रेसमध्ये पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा यावर मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मोहन जोशी आणि रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी बोलणं मात्र टाळला आहे. ‘पक्षाला जो उमेदवार योग्य वाटेल तो पक्ष देईल. मी पक्षाचा एकनिष्ठ आणि पाईक कार्यकर्ता आहे. माझ्याबरोबर अनेक सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे शहराध्यक्ष म्हणून ती निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल’. अस शिंदे म्हणालेत.
तर मोहन जोशी यांचा देखील नाव उमेदवार म्हणून पुढे येत आहे आणि धंगेकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे असं अरविंद शिंदे यांना विचारल असता त्यांनी यावर सरळ बोलणं टाळलं असून फक्त ‘नो कमेंट्स’ इतकच उत्तर दिला आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोण लढणार यावरून संघर्ष सुरू असताना आता काँग्रेसमध्ये देखील उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय.