पुणे काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. कारण काँग्रेस नेते तथा लोकमान्य टिळकांचे खापरपंतू रोहित टिळक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते आगामी काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
रोहित टिळक म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक कुटुंब आणि काँग्रेस यांचे घट्ट नाते आहे. त्या काळी काँग्रेस हा केवळ पक्ष नव्हता तर एक चळवळ होती. त्यांच्या आजोबांपासून ते स्वतःपर्यंत कुटुंबाने काँग्रेसकडून निवडणुका लढवल्या. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून पक्षात त्यांच्याबाबत सतत तक्रारी केल्या जात असल्याने दुरावा वाढत गेला.
लोकमान्य टिळक पुरस्कारावरून वाद
रोहित टिळक यांच्या ट्रस्टकडून १९८३ पासून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत मोठे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यापूर्वी इंदिरा गांधी, शरद पवार आणि प्रणव मुखर्जी यांनाही हा पुरस्कार देण्यात आला होता. मात्र तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिल्यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.
काँग्रेसमधील काही नेत्यांवर आरोप
रोहित टिळक यांच्या म्हणण्यानुसार, पुरस्कार हा सामाजिक स्वरूपाचा असून तो कोणत्याही पक्षाच्या नावाने दिला जात नाही. तरीही पक्षातील काही नेत्यांनी सतत तक्रारी केल्या. “मी अनेकदा स्पष्टीकरण दिले, पण तीच तक्रार वारंवार पुढे केली जात होती. एका सामाजिक पुरस्कारावरून इतका संकुचित विचार केला जात असेल तर पक्षात काम करणे कठीण होते,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
दोन वर्षांपासून पक्षाचे काम थांबवले
सततच्या वादामुळे आणि नाराजीमुळे त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसमधील सक्रिय कामकाज थांबवले होते. परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत करणार पक्षप्रवेश?
पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना रोहित टिळक म्हणाले की, त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा विचार केला होता. पण महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव समोर आले. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अर्ज दाखल करणे योग्य वाटले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता म्हणून शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या बदलत्या विचारांवर नाराजी, रोहित टिळकांनी सांगितल्या जुन्या आठवणी
२००५ मध्ये एनएसयूआयमध्ये असताना पाठ्यपुस्तकात विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो समाविष्ट केल्यावर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी आंदोलन करण्याचा प्रस्ताव होता. सावरकरांचा फोटो टाकला मग महात्मा गांधींचा का नाही? म्हणून सगळे आंदोलन करणार होते.
मात्र सर्व क्रांतिकारकांचा आदर राखला पाहिजे, असे मत त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे मांडले होते. त्यानंतर आंदोलन झाले नव्हते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
