• Mon. Mar 16th, 2026
    Pune Crime : रूममेट्सच्या मानसिक त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीनं जीवन संपवलं; तिघींविरुद्ध गुन्हा दाखल

    Pune Crime News : पुण्याच्या चंदननगर परिसरात १९ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रूममेट्सकडून मिळणाऱ्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

    पुण्यात रूममेट्सच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे: रूममध्ये सोबत राहणाऱ्या मैत्रिणींकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली आहे. सबुरी संतोष काळे असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित तिघींविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    नेमकी घटना काय?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबुरी ही चंदननगर परिसरातील महावीर सोसायटीमध्ये राहत होती. त्याच रूममध्ये तिच्यासोबत काही मुलीही वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून या तरुणींमध्ये काही कारणास्तव वाद सुरू होते. आरोप आहे की, सबुरीसोबत राहणाऱ्या त्या मुली तिला सातत्याने मानसिक त्रास देत होत्या. तिची समाजात बदनामी करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या आई-वडिलांना मारून टाकू’, अशा आशयाच्या धमक्या देऊन तिला भीतीखाली ठेवण्यात आले होते.

    मानसिक तणावातून टोकाचा निर्णय

    मिळालेल्या धमक्या आणि सततच्या छळामुळे सबुरी प्रचंड मानसिक तणावात होती. कोणाकडे दाद मागावी आणि हा त्रास कसा थांबवावा, या विवंचनेत असतानाच तिने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. राहत्या खोलीत पंख्याला दोरी बांधून तिने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चंदननगर पोलिसांना तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिचे कलेवर शवविच्छेदनासाठी पाठवले.

    Maharashtra TimesDombivli Crime : ‘पाणी का वाया घालवतोस?’ विचारणं महागात; डोंबिवलीत सुरक्षारक्षकाला भयंकरपणे संपवलं, तरुणाला बेड्या

    पोलीस तपास सुरू

    सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान सबुरीला देण्यात येणाऱ्या धमक्या आणि त्रासाची माहिती समोर आल्यानंतर, पोलिसांनी संबंधित तिघींवर गुन्हा दाखल केला आहे. जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या तरुणींमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वाद होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

    Maharashtra TimesNagpur News : एलपीजी काळाबाजारावर पोलिसांचा फास; गॅस एजन्सी, गोदामांवर धडक कारवाई

    एका १९ वर्षीय तरुणीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने वसतिगृहात किंवा रूम शेअरिंगमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा